अमिताभ बच्चनकडून 5.5 कोटींचे अर्थसहाय्य; फेडणार तब्बल 850 शेतकऱ्यांचे कर्ज

अमिताभ बच्चन उत्तरप्रदिश येथील तब्बल 850 शेतकऱ्यांचे कर्ज फेडण्यास पुढे सरसावले आहेत.

अमिताभ बच्चन (Photo Credits: अमिताभ बच्चन ब्लॉग)

चित्रपटसृष्टीमधील एक जबाबदार कुटुंब म्हणून बच्चन कुटुंबाकडे पहिले जाते. चित्रपटांमध्ये जीव ओतून काम करण्यासोबतच सामाजिक जबाबदारीचे भानही या कुटुंबाला आहे. विविध सामाजिक विषयांवर स्वतःचे मत व्यक्त करून एक ठोस भूमिका नेहमीच अमिताभ अथवा जया बच्चन यांच्याकडून घेतली जाते. काही कालावधीपूर्वी महाराष्ट्रातील 350 शेतकऱ्यांना त्यांचे कर्ज फेडण्यास मदत करून अमिताभ बच्चन यांनी एक आदर्श सर्वांसमोर ठेवला होता. आता परत एकदा अमिताभ बच्चन उत्तरप्रदेश येथील तब्बल 850 शेतकऱ्यांचे कर्ज फेडण्यास पुढे सरसावले आहेत.

‘आपल्या देशवासियांना काहीतरी परत देणं हे खूप समाधानकारक असतं असं’, म्हणत बच्चन शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. महाराष्ट्रातील 350 शेतकरी ज्यांना त्यांचे कर्ज फेडता येणे शक्य नव्हते, त्यांनी आत्महत्येचा पर्याय निवडू नये म्हणून अमिताभ बच्चन यांनी त्यांचे कर्ज फेडली होती. आता उत्तर प्रदेशमधल्या 850 शेतकऱ्यांची यादी आली असून, त्यांना 5.5 कोटींचे आर्थिकसहाय्य बच्चन करणार आहेत.

‘आमच्यासाठी आयुष्यभर काबाडकष्ट करणाऱया शेतकऱयांना साहाय्य करणे यासारखे दुसरे समाधान नाही. शेतकऱयांप्रमाणे देशासाठी हुतात्मा होणाऱयांनाही असे साहाय्य करणे आवश्यक आहे. मी माझ्या क्षमतेनुसार प्रयत्न करीत आहे. संपूर्ण देशात अशा प्रकारे पुढाकार घेतला गेला पाहिजे’, अशी भावना अमिताभ बच्चन यांनी या प्रसंगी बोलताना व्यक्त केली.

अमिताभ बच्चन नेहमीच गरजूंना अशी मदार करून स्वतःची देशाप्रती असलेली जबाबदारी पार पडत आहेत. नुकतेच त्यांनी केरळला 51 लाखांची मदत केली होती. तसेच त्यानंतर महाराष्ट्रातील शेतकरी आणि शहीद जवानांच्या कुटुंबीयांनाही त्यांच्याकडून मदत झाली आहे.