Ola इलेक्ट्रिक स्कूटर कारखाना चालवण्याची संपूर्ण जबाबदारी फक्त महिलांवर; होणार तब्बल 10,000 नोकरभरती
ऑटोमोबाईल क्षेत्रात तुम्ही कधी असा कारखाना पाहिला आहे का, जिथे सर्व काम फक्त महिला सांभाळतात, मग ते वरिष्ठ पद असो किंवा कनिष्ठ पद? जर नसेल तर त्यासाठी सज्ज व्हा, कारण ओला (Ola) आपला इलेक्ट्रिक स्कूटर (Electric Scooter) कारखाना चालवण्याची संपूर्ण जबाबदारी महिला कर्मचाऱ्यांना देणार आहे.
ऑटोमोबाईल क्षेत्रात तुम्ही कधी असा कारखाना पाहिला आहे का, जिथे सर्व काम फक्त महिला सांभाळतात, मग ते वरिष्ठ पद असो किंवा कनिष्ठ पद? जर नसेल तर त्यासाठी सज्ज व्हा, कारण ओला (Ola) आपला इलेक्ट्रिक स्कूटर (Electric Scooter) कारखाना चालवण्याची संपूर्ण जबाबदारी महिला कर्मचाऱ्यांना देणार आहे. ओलाचे सह-संस्थापक भावीश अग्रवाल यांनी म्हटले आहे की, कंपनीची इलेक्ट्रिक स्कूटर फॅक्टरी पूर्णपणे महिला चालवतील आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणावर 10,000 हून अधिक महिलांना रोजगार देण्यात येईल.
देशातील ऑटो मार्केटमध्ये ई-स्कूटर लाँच केल्यानंतर ओलाने आणखी एक मोठा पुढाकार घेतला आहे. भावीश अग्रवाल यांनी सांगितले की, तामिळनाडूमध्ये फक्त महिला ओला इलेक्ट्रिक स्कूटर प्लांट चालवतील. ‘आत्मनिर्भर भारता’ला स्वावलंबी महिलांची गरज आहे. हा जगातील एकमेव मोटार वाहन उत्पादन प्रकल्प असेल जो केवळ महिलांद्वारे चालविला जाईल.
भावीश अग्रवाल यांनी ओला ई-स्कूटर प्लांटमध्ये काम करणाऱ्या महिलांच्या पहिल्या तुकडीचा व्हिडिओ शेअर करून त्यांचे स्वागत केले. ते म्हणाले की, ही ओला फ्यूचरफॅक्टरी 10,000 हून अधिक महिला कर्मचाऱ्यांसह महिलांनी चालवलेली जगातील सर्वात मोठी फॅक्टरी बनेल. महिलांना आर्थिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी अधिक समावेशक कार्यबल तयार करण्याचा ओलाचा हा प्रयत्न आहे. ओला फ्यूचर फॅक्टरीमध्ये उत्पादित प्रत्येक वाहनासाठी या महिला पूर्णपणे जबाबदार असतील.
एका अहवालाचा हवाला देत ओलाचे चेअरमन अग्रवाल म्हणाले की, केवळ महिलांनाच अशा संधी मिळाल्याने देशाचा जीडीपी 27 टक्क्यांनी वाढू शकतो. ई-स्कूटर उत्पादक ओलाने गेल्या वर्षी तामिळनाडूतील आपल्या पहिल्या ई-स्कूटर प्लांटवर 2,400 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची घोषणा केली होती. सुरुवातीला ते 10 लाख प्रतिवर्षाच्या क्षमतेसह उत्पादन सुरू करतील व बाजाराच्या मागणीनुसार ते 20 लाखांपर्यंत वाढवले जाईल. ओलाने सांगितले होते की, पूर्णपणे तयार झाल्यावर, त्याच्या प्लांटमध्ये वार्षिक 10 दशलक्ष ई-वाहनांची निर्मिती क्षमता असेल. (हेही वाचा: Upcoming Electric Cars: 'या' इलेक्ट्रिक कार एका चार्जिमध्ये चालणार 660 किमी, जाणून घ्या कोणत्या आहेत कार ?)
दरम्यान, कंपनीच्या स्कूटरची विक्री 15 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 8 वाजल्यापासून सुरू होणार आहे. ओला ने नुकतेच ओला एस 1 आणि ओला एस 1 प्रो हे दोन इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केले. लोक या दोन्ही स्कूटरची आतुरतेने वाट पाहत आहेत. ओला एस 1 ची एक्स-शोरूम किंमत 99,999 रुपये ठेवण्यात आली आहे. त्याचबरोबर Ola S1 Pro ची किंमत 1,29,999 लाख रुपये आहे.