Tesla-Tata Semiconductor Chips Deal: टाटा कंपनी टेस्लासाठी बनवणार सेमीकंडक्टर चिप्स; Elon Musk यांच्या भारतभेटीआधी दोन्ही कंपन्यांमध्ये मोठा करार

या धोरणात्मक करारांतर्गत, टेस्ला जगभरातील कामकाजासाठी टाटा कंपनीकडून सेमीकंडक्टर चिप्स खरेदी करणार आहे.

Elon Musk (Photo Credit: PTI)

Tesla-Tata Semiconductor Chips Deal: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेल्या एलॉन मस्क यांचा बहुप्रतिक्षित पहिला भारत दौरा अनेक अर्थांनी महत्त्वाचा ठरणार आहे. या भेटीदरम्यान ते टेस्ला आणि इतर व्यवसायांद्वारे भारतात अब्जावधी डॉलर्सच्या गुंतवणुकीची घोषणा करू शकतात. त्याआधी, असे सांगितले जात आहे की मस्कची ईव्ही कंपनी टेस्लाने सेमीकंडक्टर चिप्ससाठी (Semiconductor Chips) भारतातील सर्वात प्रमुख औद्योगिक गटांपैकी एक असलेल्या टाटासोबत करार केला आहे.

अहवालानुसार, अमेरिकन इलेक्ट्रिक वाहन कंपनीने टाटा समूहाच्या टाटा इलेक्ट्रॉनिक्ससोबत सेमीकंडक्टरसाठी करार केला आहे. या धोरणात्मक करारांतर्गत, टेस्ला जगभरातील कामकाजासाठी टाटा कंपनीकडून सेमीकंडक्टर चिप्स खरेदी करणार आहे. हा करार काही महिन्यांपूर्वी गुपचूप फायनल झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, टेस्ला किंवा टाटा या दोघांनीही अद्याप या कराराबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.

सेमीकंडक्टरसाठी टेस्लाचा टाटा इलेक्ट्रॉनिक्ससोबतचा करार खरा ठरला, तर टाटा समूहाच्या या नव्या व्यवसायाला मोठी चालना मिळेल. टेस्ला ही नव्या युगातील तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये आघाडीवर गणली जाते. अशा परिस्थितीत टेस्लाने दाखविलेल्या आत्मविश्वासामुळे टाटा इलेक्ट्रॉनिक्सचा जागतिक दर्जा वाढेल. टाटा इलेक्ट्रॉनिक्ससाठी सेमीकंडक्टर व्यवसाय फार जुना नाही. भारत सरकारने अलीकडेच देशाला स्वावलंबी बनवण्यासाठी आणि देशातील उत्पादन वाढवण्यासाठी विविध उपक्रम सुरू केले आहेत. त्यामध्ये सेमीकंडक्टर उत्पादनाला प्रोत्साहन देणे देखील समाविष्ट आहे. टाटा इलेक्ट्रॉनिक्सनेही सेमीकंडक्टर पीएलआय योजनेचा लाभ घेतला आहे. (हेही वाचा: Starlink Receives Government Approval: लवकरच भारतामध्ये उपलब्ध होऊ शकते Elon Musk यांच्या स्टारलिंकची इंटरनेट सेवा; मंत्रालयाकडून मिळाली तत्वतः मान्यता)

टेस्लापूर्वी ॲपलसारख्या कंपन्याही टाटाच्या जागतिक ग्राहकांमध्ये सामील झाल्या आहेत. दरम्यान, टेस्लाचे मालक एलोन मस्क 22 ते 27 एप्रिल दरम्यान भारत दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी ते पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत भारतात कार निर्मिती प्रकल्प उभारण्यासह काही मोठ्या घोषणा करू शकतात. असा अंदाज आहे की टेस्ला भारतात 2-3 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करू शकते. टेस्लाला भारतात कार निर्मिती आणि बॅटरी स्टोरेज प्लांट उभा करायचा आहे. कंपनी गुजरात, महाराष्ट्र आणि तामिळनाडूमध्ये जागा शोधत आहे.