Tata Motors to Hike Prices of Commercial Vehicles: टाटा मोटर्सचा ग्राहकांना मोठा झटका; व्यावसायिक वाहनांच्या किंमतीमध्ये होणार वाढ, 1 जुलैपासून नवे दर लागू
भविष्यातील गतिशीलता लक्षात घेऊन अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान-सक्षम ऑटोमोटिव्ह सोल्यूशन्सवर लक्ष केंद्रित करण्यासाठी, कंपनीने सध्याच्या वाहनाच्या किमतीत वाढ केली आहे.
Tata Motors to Hike Prices of Commercial Vehicles: देशातील आघाडीची ऑटोमोबाईल कंपनी (Automobile Company) टाटा मोटर्सने (Tata Motors) आपल्या ग्राहकांना झटका दिला आहे. कंपनीने आपल्या व्यावसायिक वाहनांच्या किमती वाढवण्याची घोषणा केली आहे. टाटा मोटर्सची वाहने जवळपास 2 टक्क्यांनी महागणार आहेत. नवीन दर 1 जुलैपासून लागू होणार आहेत. टाटा मोटर्सने बुधवारी सांगितले की, वस्तूंच्या किमतीत वाढ झाल्यामुळे आपल्या वाहनांचे दर वाढवावे लागले आहेत. कंपनीने आपल्या एक्सचेंज फाइलिंगमध्ये ही माहिती दिली आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, किमतीतील वाढ सर्व व्यावसायिक वाहनांच्या श्रेणीवर लागू होईल आणि ही वाढ वेगवेगळ्या मॉडेल्स आणि प्रकारांनुसार बदलेल.
टाटा मोटर्सने या वर्षातील व्यावसायिक वाहनांच्या किमतीत केलेली ही तिसरी वाढ आहे. या वर्षाच्या सुरुवातीला, टाटा मोटर्स लिमिटेडने उत्पादन खर्चात वाढ झाल्यामुळे 1 एप्रिल 2024 पासून किमतीत दोन टक्के वाढ जाहीर केली होती. त्याआधी कंपनीने 1 जानेवारीपासून व्यावसायिक वाहनांच्या किमतीत 3 टक्के पर्यंत वाढ करण्याची घोषणा केली होती. (हेही वाचा: Hyundai Motor India IPO: ह्युंदाई मोटर इंडियाचा आयपीओ लवकरच येणार बाजारात; कंपनी 25 हजार कोटी रुपये उभारणार)
टाटा मोटर्स पुढील पिढीच्या ग्राहकांना आकर्षित करू शकतील अशी नवीन उत्पादने आणण्याचा प्रयत्न करत आहे. भविष्यातील गतिशीलता लक्षात घेऊन अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान-सक्षम ऑटोमोटिव्ह सोल्यूशन्सवर लक्ष केंद्रित करण्यासाठी, कंपनीने सध्याच्या वाहनाच्या किमतीत वाढ केली आहे. यापुढील काळातही नाविन्याचा प्रचार सुरूच राहणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
टाटा मोटर्सने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, कंपनी सध्या नवीन उत्पादने लॉन्च करण्याच्या तयारीत व्यस्त आहे. भारत, ब्रिटन, अमेरिका, इटली आणि दक्षिण कोरियामधील नेक्स्ट जनरेशन ग्राहकांच्या गरजेनुसार ही वाहने तयार केली जात आहेत. ही सर्व वाहने आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असतील. दुसरीकडे, टाटा मोटर्सच्या मालकीच्या जग्वार आणि लँड रोव्हरने त्यांची लोकप्रिय कार फ्रीलँडर नवीन शैलीत लॉन्च करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी चीनच्या चेरी ऑटोमोबाईलसोबत भागीदारी केली आहे. फ्रीलँडरला इलेक्ट्रिक अवतारात आणले जाईल. फ्रीलँडर जवळपास एक दशकापूर्वी बंद करण्यात आला होता.