आता ना टायर पंक्चर होण्याची भीती, ना हवा भरण्याची कटकट; कारण बाजारात येत आहे Airless Tires
यामुळे जास्तीत जास्त भार सहन करण्याची क्षमता या टायरमध्ये निर्माण होणार आहे
गाडी चालवणाऱ्या लोकांना नेहमीच टायर पंक्चर होण्याची किंवा टायरची हवा कमी होण्याची भीती असते. यासाठी लांबच्या प्रवासाला जात असताना हमखास ज्यादा स्टेपनी ठेवली जाते. सध्या बाजारात ट्यूबलेस टायर्स (Tubeless Tire) आलेले आहेत, ज्यामुळे टायर पंक्चर होण्याचा धोका नसतो. मात्र लोकप्रिय कंपनी मिशेलिन (Michelin) आणि जनरल मोटर्सने (General Motors) कारसाठी नव्या जनरेशनचे 'एयरलेस व्हील' (Airless Wheel) तंत्रज्ञान सादर केले आहे. या तंत्राला यूनिक पंचरप्रूफ टायर सिस्टम (Uptis) म्हणतात, ज्यामध्ये हवा भरली जात नाही. या नवीन तंत्रामुळे आता हवा कमी होण्याची किंवा पंक्चर होण्याची कोणतीही भीती नाही.
संयुक्त संशोधन करारानुसार, दोन्ही कंपन्या 2024 च्या प्रारंभी प्रवासी मॉडेलवर यूप्टीस सादर करण्याच्या उद्देशाने, प्रोटोटाइपवर काम करण्यास सुरुवात करतील. या वर्षाच्या अखेरीस कंपन्या मिशिगनमध्ये बोल्ट ईव्ही वाहनांसाठी यूप्टीसचे प्रत्यक्ष परीक्षण सुरू करतील. टायरवर दाब पडल्यावर ते लवचिक बनेल अशा प्रकारचे मटेरिअल यासाठी वापरले जात आहे. यामुळे जास्तीत जास्त भार सहन करण्याची क्षमता या टायरमध्ये निर्माण होणार आहे. सध्याच्या काळातील अत्याधुनिक वाहने डोक्यात ठेऊन खास त्यांच्यासाठी या टायर्सची निर्मिती केली गेली आहे. ही टायर्स एअरलेस असल्याने त्यांच्यासाठी कोणताही मेंटेनन्स खर्च येणार नाही. (हेही वाचा: सेकंडहँड गाडी खरेदी करताय? व्यवहार करण्याआधी या गोष्टींची काळजी नक्की घ्या)
मिशेलिन गेल्या पाच वर्षांपासून अशा एअरलेस टायर्सवर काम करत आहे. जगभरात दरवर्षी जवळजवळ 200 मिलियन टायर वेळापुर्वी पंक्चर होतात, अथवा इतर कोणत्याही कारणामुळे खराब होतात. मात्र आता यूप्टीस तंत्रामुळे हे प्रमाण कमी होईल. या नवीन प्रयोगासास्ठी कंपनीने 50 मिलियन डॉलरचे बजेट निश्चित केले आहे.