1 एप्रिल पासून भारतीय ऑटो इंडस्ट्रीमध्ये होणार मोठा बदल; बंद होणार बीएस-4 वाहने
आपल्या बीएस-4 (Bharat Stage-4) वाहनाची आरटीओ नोंदणी झालेली नसेल, तर ती लवकरच करून घ्या. याबाबत केवळ 29 फेब्रुवारीपर्यंत कागदपत्रे स्वीकारली जातील.
येत्या 1 एप्रिलपासून भारतीय वाहन इंडस्ट्रीमध्ये एक मोठा बदल होत आहे. आपल्या बीएस-4 (Bharat Stage-4) वाहनाची आरटीओ नोंदणी झालेली नसेल, तर ती लवकरच करून घ्या. याबाबत केवळ 29 फेब्रुवारीपर्यंत कागदपत्रे स्वीकारली जातील. 1 एप्रिल नंतर आरटीओ या बीएस-4 गाड्यांची नोंदणी करणार नाही. प्रदूषण नियंत्रणासाठी ठरवलेल्या निकषांचे पालन करण्यासाठी सर्व बीएस-4 मॉडेल वाहनांची आरटीओ नोंदणी बंद केली जात आहे.
याचाच दुसरा अर्थ 1 एप्रिलपासून बीएस-4 वाहने बंद होत आहेत. विविध राज्यांच्या अतिरिक्त परिवहन आयुक्तांनी, 18 फेब्रुवारी रोजी वाहन नोंदणीसंदर्भात राज्यभरातील परिवहन अधिकाऱ्यांना हे निर्देश जारी केले आहेत.
बीएस-4 मॉडेल वाहनांची नोंदणी 1 एप्रिलपासून होणार नाही. त्यापूर्वी, सर्व प्रलंबित वैध कागदपत्रे सादर करून, वाहनांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगण्यात आले आहे. याबाबत बोलताना परिवहन अधिकारी म्हणाले की, वाहन विक्रेत्यांनीही असे आवाहन केले आहे की, जर त्यांच्या डिलर पॉईंटला नोंदणीत अडथळा असेल किंवा त्यांना अद्याप नोंदणी क्रमांक दिलेला नसेल, तर वाहन खरेदीदार डिलर पॉईंटकडून खरेदीची सर्व कागदपत्रे घेऊन अर्ज करून प्रादेशिक परिवहन कार्यालयात नोंदणी करू शकतात.
इंजिनची क्षमता किती उत्सर्जित होते या आधारावर हे मॉडेल केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने ठरविले आहे. त्यानुसार आता धूर रहित इंजिन तयार करण्याच्या नवीन तंत्रज्ञानाच्या वापरणे बीएस-6 मॉडेल तयार केले आहे. हे चारचाकी वाहनांमध्ये उपलब्ध आहे, परंतु दुचाकी वाहनांमध्ये ते जास्त उपलब्ध नाही. सर्वोच्च न्यायालयाने 24 ऑक्टोबरला दिलेल्या आदेशानंतर परिवहन विभागाने हे पाऊल उचलले आहे. (हेही वाचा: Suzuki Burgman Street 125 BS6 भारतात लॉन्च; पहा स्टायलिश लूक आणि फिचर्स)
डीलर्सना बीएस-4 चा सध्याचा साठा मार्चच्या पहिल्या तारखेपर्यंत काढून टाकण्यास सांगितले आहे. याबाबत 25 फेब्रुवारीपर्यंत, किती वाहने विकली आहेत आणि किती शिल्लक आहेत याबाबत सर्व डीलर्सकडे माहिती मागविली आहे.