भारतातील पहिल्या Internet Car चे अनावरण, 5G फोनलाही होणार कनेक्ट; समाविष्ट आहेत विश्वास न बसणारे फीचर्स

हेक्टर (Hector) असे या गाडीचे नाव असून, यामध्ये 50 हून अधिक आश्चर्यचकित करणारे फीचर्स दिले आहेत

MG Hector 2019 Unveiled (Photo Credits: MG Motor India)

भारतातील ऑटोमोबाईल (Automobile) क्षेत्र मोठ्या प्रमाणावर विस्तारीत होत आहे. व्यवसायाला इथे फार मोठा स्कोप निर्माण होत आहे, यामुळेच अनेक कार निर्मिती कंपन्या भारतात आपल्या कार लॉंच करण्यास उत्सुक असतात. काल लोकप्रिय ब्रिटीश कार कंपनी एम जी मोटार (MG Motor) ने देशात पहिल्या इंटरनेट कारचे (Internet Car) अनावरण केले. हेक्टर (Hector) असे या गाडीचे नाव असून, यामध्ये 50 हून अधिक आश्चर्यचकित करणारे फीचर्स दिले आहेत. पुढच्या महिन्यापासून या कारची विक्री सुरु होईल.

फीचर्स - इंटरनेट कार म्हणजे यातील सर्व फीचर्स हे इंटरनेटशी जोडलेले असतील. यामध्ये 48V हायब्रेड तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे, अशी ही भारतातील पहिली कार आहे. ही कार तुम्ही 5G फोनलाही कनेक्ट करू शकता. यातील सर्वात खास वैशिष्ट्य हे व्हॉईस कमांड (Voice Command) आहे, ज्यामध्ये तुम्ही कारशी संवाद साधू शकता. ही यंत्रणा खिडक्या आणि सन-रूफ उघडणे किंवा बंद करणे, वातानुकूलन यंत्रणा, नेव्हिगेशन इत्यादीचे नियंत्रण करते.

अँड्रॉइड ऑटो, अॅपल कारप्लेला यांना सपोर्ट करणाऱ्या या गाडीत 10.4-इंच टचस्क्रीन, ड्युअल पेन पॅनोरॅमिक सनरूफ, 360 डिग्री कॅमेरा, एलईडी हेडलाइट्स, क्रुज कंट्रोल, अॅडजस्टेबल सीट्स अशा गोष्टी देण्यात आल्या आहेत. यामध्ये i-SMART नेक्स्ट जेन टेक्नॉलॉजी समाविष्ट केली आहे, ज्याद्वारे हार्डवेअर, सॉफ्टवेअर, अॅप्स आणि इतर सेवा एकत्र जोडल्या जातात. सोबत एम 2 एम एम्बेडेड सिम, ई-कॉल, नेव्हिगेशन यांसारख्या सुविधाही देण्यात आल्या आहेत.

MG Hector 2019 Unveiled (Photo Credits: MG Motor India)

डिस्क ब्रेकसह, ट्रॅक्शन कंट्रोल, हिल होल्ड कंट्रोल आणि व्हेइकल स्टॅबिलिटी मॅनेजमेंट अशी सुरक्षा फीचर्सही यामध्ये देण्यात आले आहेत. ग्लेज रेड, बर्गंडी रेड, ब्लॅक, ऑरोरा सिल्वर आणि कँडी व्हाइट अशा पाच रंगांमध्ये ही कार उपलब्ध असणार आहे. (हेही वाचा: या महिन्यात Hyundai Santro ची नवी ऑफर; तब्बल 31 हजाराची घसघसीत सूट)

इंजिन – ही गाडी पेट्रोल आणि डिझेल अशा दोन्ही प्रकारांमध्ये लाँच केली जाणार आहे. पेट्रोल व्हेरिअंटमध्ये 1.5 लिटरचे टर्बो चार्ज्ड इंजिन आहे. हे इंजिन 143PS पावर आणि 250Nm पीक टॉर्क जनरेट करते. तर, डिझेल व्हेरिअंटमध्ये 2.0 लिटर इंजिन असेन, हे इंजिन 170Ps पावर आणि 350Nm पीक टॉर्क जनरेट करते.

खास भारतातील ग्राहक, इथल्या भाषा, सोई-सुविधा लक्षात घेऊन या कारची निर्मिती करण्यात आली आहे. भारतातील 50 शहरांमध्ये ही कार विक्रीसाठी उपलब्ध असेल.