World's Richest Cities List 2023: न्यूयॉर्क ठरले जगातील सर्वात श्रीमंत शहर; मुंबई जागतिक स्तरावर 21 व्या स्थानावर, जाणून घ्या यादी

कमाईच्या संधीसाठी किंवा चांगल्या जीवनशैलीसाठी लोक मोठ्या प्रमाणावर शहरांकडे जात आहेत. अहवालानुसार, 2050 पर्यंत जगातील 70 टक्के लोकसंख्या शहरी भागात राहण्याची अपेक्षा आहे.

Rich Cities (Representational Image; Photo Credit: Pixabay)

अमेरिकेतील न्यूयॉर्क (New York) शहराने 2023 मध्ये सर्वाधिक लक्षाधीशांसह पुन्हा एकदा जगातील सर्वात श्रीमंत शहराचा (World's Richest City) मान पटकावला आहे. जागतिक संपत्ती ट्रॅकर हेन्ली अँड पार्टनर्सच्या मते, शहरात 3,40,000 लक्षाधीश आहेत. न्यूयॉर्कनंतर टोकियो आणि सॅन फ्रान्सिस्को बे एरियामध्ये अनुक्रमे 290,300 आणि 285,000 लक्षाधीश आहेत. जगातील सर्वात श्रीमंत शहरे अहवाल 2023 मध्ये जगभरातील नऊ विभागांमधील- आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, सीआयएस (CIS), पूर्व आशिया, युरोप, मध्य पूर्व, उत्तर अमेरिका, दक्षिण आशिया आणि दक्षिण पूर्व आशिया, 97 शहरांचा समावेश आहे.

या यादीत अमेरिकेचे वर्चस्व असून न्यूयॉर्क, द बे एरिया, लॉस एंजेलिस आणि शिकागो या चार शहरांनी यादीत स्थान मिळवले आहे. यामध्ये चीनमधील बीजिंग आणि शांघाय या दोन शहरांचा समावेश करण्यात आला आहे. जवळजवळ 258,000 लक्षाधीशांसह या वर्षीच्या यादीत लंडन चौथ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर 240,100 लक्षाधीशांसह सिंगापूरचा क्रमांक लागतो. याआधी 2000 मध्ये, लंडन हे लक्षाधीशांच्या संख्येच्या बाबतीत जगातील पहिल्या क्रमांकाचे शहर होते, परंतु गेल्या 20 वर्षांत ते यादीत खाली घसरले आहे.

या यादीत मुंबई आणि दिल्लीचाही समावेश करण्यात आला आहे. मुंबई हे भारतामधील सर्वात श्रीमंत शहर ठरले आहे. मुंबईमध्ये 59,400 लक्षाधीश असून, जागतिक स्तरावर शहराचा 21 वा क्रमांक आहे. पुढील एका दशकात शहरातील लक्षाधीशांची संख्या दुप्पट होण्याची अपेक्षा आहे. अहवालानुसार, दिल्लीत 30,200 लक्षाधीशांनी आहेत. दिल्ली हे भारतामधील दुसरे सर्वात श्रीमंत शहर ठरले आहे. (हेही वाचा: Mumbai-Pune Expressway Tunnel: जानेवारी 2025 मध्ये सुरू होईल मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे बोगदा, जाणून घ्या सविस्तर)

दरम्यान, जगात सुमारे 5.6 कोटी लक्षाधीश आहेत जे निम्म्याहून अधिक जागतिक संपत्तीवर नियंत्रण ठेवतात. कमाईच्या संधीसाठी किंवा चांगल्या जीवनशैलीसाठी लोक मोठ्या प्रमाणावर शहरांकडे जात आहेत. अहवालानुसार, 2050 पर्यंत जगातील 70 टक्के लोकसंख्या शहरी भागात राहण्याची अपेक्षा आहे.