World's Powerful Military: अमेरिकेकडे आहे जगातील सर्वात ताकदवान लष्करी शक्ती; पाकिस्तान 7 व्या क्रमांकावर, जाणून घ्या भारताचे स्थान
महत्वाचे म्हणजे पाकिस्तानने यावर्षी टॉप 10 मध्ये सातव्या स्थानावर प्रवेश केला आहे. यूके गेल्या वर्षी आठव्या स्थानावरून या वर्षी पाचव्या स्थानावर पोहोचला आहे.
ग्लोबल फायरपॉवर या जागतिक संरक्षण माहितीवर नजर ठेवणाऱ्या डेटा वेबसाइटने जगातील सर्वात शक्तिशाली सैन्याची (Strongest Military Force) यादी जाहीर केली आहे. ग्लोबल फायरपॉवरच्या मते, अमेरिकेकडे जगातील सर्वात ताकदवान, मजबूत लष्करी शक्ती आहे. या यादीत रशिया दुसऱ्या तर चीन तिसऱ्या क्रमांकावर आहे. यासोबतच भारताने चौथ्या स्थानावर आपली पकड कायम ठेवली आहे.
या यादीत जगातील सर्वात कमकुवत लष्करी शक्ती असलेल्या देशांचाही समावेश आहे. यात भूतान, आइसलँडचा समावेश आहे. जवळजवळ 60 पेक्षा जास्त घटकांवर याचे मूल्यांकन केले गेले आहे. ग्लोबल फायरपॉवरने म्हटले आहे की, त्यांनी प्रत्येक देशाला लष्करी तुकड्यांची संख्या, आर्थिक स्थिती, लॉजिस्टिक क्षमता आणि भौगोलिक स्थान या श्रेणींमध्ये गुण दिले आहेत. (हेही वाचा; PM Modi France Visit: भारत फ्रान्सकडून 26 राफेल, 3 स्कॉर्पीन पाणबुड्या खरेदी करणार; पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यादरम्यान होऊ शकते कराराची घोषणा)
जगातील सर्वात शक्तिशाली सैन्य असलेले 10 देश आहेत-
अमेरिका
रशिया
चीन
भारत
युनायटेड किंगडम (यूके)
दक्षिण कोरिया
पाकिस्तान
जपान
फ्रान्स
इटली
जगातील सर्वात कमी शक्तिशाली सैन्य असलेले 10 देश-
भूतान
बेनिन
मोल्डोव्हा
सोमालिया
लायबेरिया
सुरीनाम
बेलीज
सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक
आइसलँड
सिएरा लिओन
अहवालात 145 देशांची यादी जारी करण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे पाकिस्तानने यावर्षी टॉप 10 मध्ये सातव्या स्थानावर प्रवेश केला आहे. यूके गेल्या वर्षी आठव्या स्थानावरून या वर्षी पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. दक्षिण कोरिया गेल्या वर्षीप्रमाणे सहाव्या स्थानावर आहे. जपान आणि फ्रान्स गेल्या वर्षी पाचव्या आणि सातव्या क्रमांकावर होते, या वर्षी ते अनुक्रमे आठव्या आणि नवव्या स्थानावर पोहोचले आहेत. यासह युक्रेनवर आक्रमण करण्यासाठी 'विशेष ऑपरेशन' सुरू केल्यानंतर युक्रेनियन सैन्याला रोखण्यात रशियाची स्पष्ट असमर्थता लक्षात घेता, रशिया दुसऱ्या स्थानावर राहण्याबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.