Hospital Death | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

अमेरिकेतील टेक्सास (Texas) येथील एका 71 वर्षीय महिलेचा मेंदू खाणारा जंतू म्हणजेच अमीबामुळे (Brain-Eating Amoeba) मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या महिलेने नाक धुण्यासाठी नळाच्या पाण्याचा वापर केला होता, त्यानंतर तिला संसर्ग झाला व काही दिवसांनी मृत्यू. या घटनेमुळे आरोग्य यंत्रणांनी नाक धुण्यासाठी फक्त निर्जंतुक पाण्याचा वापर करण्याचा सल्ला दिला आहे. ही महिला टेक्सासमधील एका कॅम्पग्राउंडवर आपल्या रिक्रिएशनल व्हेईकल (RV) मध्ये राहत होती व तिला सायनसचा त्रास होता.

तिने आपल्या नाकाच्या स्वच्छतेसाठी आरव्हीमधील नळाचे पाणी वापरले, जे निर्जंतुक नव्हते. या पाण्यात नाएग्लेरिया फॉवलेरी नावाचा एक सूक्ष्म जंतू असण्याची शक्यता होती, जो सामान्यतः उबदार गोड्या पाण्यात आढळतो. हा जंतू नाकातून शरीरात प्रवेश करतो आणि मेंदूपर्यंत पोहोचून प्रायमरी अमीबिक मेनिंगोएन्सेफलायटिस (PAM) नावाचा एक दुर्मीळ आणि प्राणघातक आजार निर्माण करतो.

या पाण्याने महिलेने नाक धुतल्यानंतर चार दिवसांनी तीव्र डोकेदुखी, ताप आणि गोंधळ यासारखी लक्षणे दिसू लागली. तिची प्रकृती झपाट्याने खालावली आणि तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तिला पीएएमचे निदान केले, परंतु उपचारांना यश आले नाही आणि लक्षणे दिसल्यानंतर अवघ्या आठ दिवसांत तिचा मृत्यू झाला. वैद्यकीय तपासणीत आरव्हीच्या पाण्याच्या टाकीत जंतू आढळले नाहीत, परंतु पाणी प्रणाली योग्यरित्या निर्जंतुक न केल्याने जंतूंचा धोका वाढला असावा, असे तज्ज्ञांचे मत आहे.

नाएग्लेरिया फॉवलेरी हा जंतू उबदार पाण्यात, विशेषतः तलाव, नद्या आणि गरम पाण्याच्या झऱ्यांमध्ये आढळतो. हा जंतू नाकातून मेंदूपर्यंत पोहोचतो आणि मेंदूला हानी पोहोचवतो. हा आजार अत्यंत दुर्मीळ आहे, परंतु त्याचा मृत्यूदर 97% पेक्षा जास्त आहे. अमेरिकेत 1962 ते 2022 दरम्यान फक्त 157 रुग्णांची नोंद झाली आहे, ज्यापैकी केवळ चार जण वाचले आहेत. हा जंतू पिण्याच्या पाण्याद्वारे शरीरात प्रवेश करत नाही, कारण पोटातील आम्ल त्याला नष्ट करते. परंतु नाकातून प्रवेश केल्यास तो थेट मेंदूपर्यंत पोहोचतो. (हेही वाचा: SOP For Covid-19 Management: महाराष्ट्रात 86 नवीन कोविड-19 रुग्णांची नोंद; एकूण संख्या 959, सरकारने जारी केले मार्गदर्शक तत्वे)

या घटनेनंतर आरोग्य अधिकाऱ्यांनी नाक धुण्यासाठी स्वच्छतेच्या साधनांचा वापर करताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. नाक धुण्यासाठी फक्त निर्जंतुक किंवा उकळलेले आणि थंड केलेले पाणी वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे. सामान्य नळाचे पाणी किंवा फिल्टर केलेले पाणी वापरणे धोकादायक ठरू शकते. तसेच, आरव्ही वापरणाऱ्या व्यक्तींनी त्यांच्या पाण्याच्या टाक्या नियमितपणे स्वच्छ आणि निर्जंतुक कराव्यात, असेही सुचवण्यात आले आहे. या घटनेमुळे लोकांमध्ये नाक स्वच्छतेच्या साधनांचा वापर आणि पाण्याच्या सुरक्षिततेबाबत जागरूकता वाढली आहे. तज्ज्ञांनी सांगितले की, योग्य काळजी घेतल्यास असा धोका टाळता येऊ शकतो.