कोरोनाचे नवे टार्गेट अमेरिका? एकाच दिवसात 10 हजार नागरिकांना COVID19 ची लागण: WHO
यावरून तरी कोरोनाचे नवे टार्गेट अमेरिका असल्याचे संकेत आहेत असेही WHO ने म्हंटले आहे.
कोरोनाची (Coronavirus) लागण झालेले लाखो रुग्ण सध्या जगभरात आहेत, चीन (China) मधून सुरु झालेला हा व्हायरस रोखणे जगातील मोठमोठ्या देशांपुढचे आव्हान ठरले आहे. सद्य घडीला या व्हायरसची चीन मधील दहशत कमी झाली असली तरी इटली (Italy) मध्ये याचे गंभीर पडसाद अजूनही उमटत आहेत. लाखो संक्रमित रुग्ण आणि हजारो मृत्यू अशी दिवसाची आकडेवारी इटली मध्ये पाहायला मिळतेय. याबाबात जागतिक आरोग्य संस्थेने माहिती देताना, इटली मधील परिस्थिती गंभीर असल्याचे सांगताना जागतिक महासत्ता अमेरिकेला सुद्धा इशारा दिला आहे, अमेरिकेत काही दिवसांपूर्वी अवघ्या 24 तासात 100 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता तर काल सोमवारी, एकाच दिवसात 10 हजारहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यावरून तरी कोरोनाचे नवे टार्गेट अमेरिका असल्याचे संकेत आहेत असेही WHO ने म्हंटले आहे.
अमेरिकेत करोनाची बाधा झालेल्या रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. पुढच्या काही दिवसात युरोपपेक्षा अमेरिकेत जास्त रुग्ण आढळून येतील असा जागतिक आरोग्य संघटनेचा अंदाज आहे.अमेरिकेत एकाच दिवसात 10 हजार करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर आतापर्यंत 150 अमेरिकन नागरीकांचा मृत्यू झाला आहे. याबाबत WHO च्या प्रवक्त्या मारग्रेट हॅरिस यांनी पत्रकारांना माहिती दिली आहे. Coronavirus: कोरोना व्हायरसचा जगभरात हाहा:कार; स्पेनमध्ये गेल्या 24 तासात 514 जणांचा मृत्यू
दरम्यान, सोमवारी रात्री प्रसिद्ध झालेल्या WHO च्या लेटेस्ट आकडेवारीनुसार मागील 24 तासात युरोपमध्ये 20,131 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. अमेरिकेत हीच संख्या 16,534 आहे. यानुसार कोरोनाची 85 टक्के प्रकरणे युरोप आणि अमेरिकेतील आहेत . भारतात सध्या तरी कोरोनाचे रुग्ण 500 च्या घरात आहेत मात्र जनतेने सहकार्य न केल्यास काहीच काळात हा संसर्ग लाखोंच्या संख्येत वाढू शकतो. खबरदारीचा पर्याय म्ह्णून सध्या भारतात लॉक डाऊन करण्यात आले आहे.