कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढण्यासाठी WHO सुद्धा दोषी? चीनच्या ‘या’ गोष्टीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप; अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी
जगातील प्रत्येक देश या प्राणघातक विषाणूपासून मुक्त होण्यासाठी प्रयत्न करीत आहे. परंतु अद्यापपर्यंत यावर कोणताही तोडगा निघालेला नाही
संपूर्ण जग सध्या कोरोना विषाणू (Coronavirus) सारख्या जागतिक साथीच्या आजाराशी झगडत आहे. जगातील प्रत्येक देश या प्राणघातक विषाणूपासून मुक्त होण्यासाठी प्रयत्न करीत आहे. परंतु अद्यापपर्यंत यावर कोणताही तोडगा निघालेला नाही व दिवसेंदिवस कोरोनाची प्रकरणे वाढतच आहेत. चीन (China) ने कोरोना व्हायरस बाबत दिलेल्या प्रतिसादाबद्दल आणि त्याचे डब्ल्यूएचओद्वारे (WHO) केल्या गेलेल्या व्यवस्थापनाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आता अमेरिकन राजकारण्यांनी कोरोना विषाणूबद्दल जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस अधानोम (Tedros Adhanom) यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
कोरोना विषाणूला जन्म देणाऱ्या चीनमध्ये या विषाणूमुळे हाहाकार माजला होता. आत इथली परिस्थतीत थोडीफार नियंत्रणात आहे. अशा परिस्थितीत अनेक पाश्चात्य देश चीनला प्रश्न विचारत आहेत. या देशांमधील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, चीनने कोरोना संसर्गाबाबत योग्य माहिती दिली नाही, अनेक आकडे लपवून ठेवले. अशा परिस्थितीत अमेरिकन राजकारणी चीनच्या कम्युनिस्ट सरकारवर विसंबून राहिल्याबद्दल डब्ल्यूएचओच्या प्रमुखांना लक्ष्य करत आहेत व त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
घडलेल्या गोष्टीबद्दल आता डब्ल्यूएचओच्या पारदर्शकतेवर प्रश्न उठत आहेत. अमेरिकन रिपब्लिकन सिनेटर मार्था मॅकस्ली म्हणाल्या की, चीनने ज्या प्रकारे गोष्टी लपवून, आकडे लपवून फसवणूक केली, त्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांचीही काही प्रमाणात दोष आहे. त्यांनी संपूर्ण जगाची फसवणूक केली आहे, त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा. (हेही वाचा: कोरोना व्हायरसने जगभरात घेतले 75 हजाराहून अधिक बळी)
एका अहवालानुसार फेब्रुवारीपर्यंत चीनमध्ये कोरोना व्हायरस संसर्गाच्या 17,238 घटना घडल्या होत्या. तर या विषाणूच्या संसर्गामुळे 361 लोकांचा मृत्यू झाला होता. या आकडेवारीनंतरही डब्ल्यूएचओ प्रमुख म्हणाले होते की, सध्या प्रवासावर बंदी घालण्याची गरज नाही. आता काही लोकांचा असा आरोप आहे की, चीनमधील कोरोनामुळे झालेल्या मृत्यूची वास्तविक संख्या 40 हजारांपर्यंत असू शकते.