White House च्या वकिलांची Meena Harris ना सक्त ताकीद- 'स्वतःचा ब्रँड उभारण्यासाठी आपली मावशी Kamala Harris यांचे नाव वापरणे बंद कर'
निवडणुकीनंतर मीनावर कमला हॅरिसचे नाव वापरण्यास बंदी घातली गेली.
भारतातील शेतकरी चळवळीत उडी घेतलेल्या अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिस (Kamala Harris) यांची भाची मीना हॅरिस (Meena Harris) यांना, आता राष्ट्राध्यक्ष कार्यालय व्हाईट हाऊसकडून मोठा धक्का बसला आहे. मीना यांना व्हाईट हाऊसच्या वकिलांनी इशारा दिला आहे की त्यांनी त्यांच्या मावशीचे नाव स्वतःच्या ब्रँडिंगसाठी वापरू नये. मीना स्वत: एक वकील होत्या आणि नंतर त्यांनी आपला व्यवसाय सुरू केला. त्यांची कंपनी कपडे, डिझायनर हेडफोन आणि मुलांची पुस्तकांचा व्यवसाय करते. मीना लेखिकाही आहेत. त्या बर्याच काळापासून कमला हॅरिस यांचे नाव स्वतःच्या व्यवसायाच्या ब्रँडिंगसाठी वापरत आहेत.
आता व्हाइट हाऊसने मीना हॅरिसला आपला ब्रँड तयार करण्यासाठी कमला हॅरिसचे नाव न वापरण्यास सांगितले आहे. तसेच कोणत्याही व्यावसायिक कार्यक्रमासाठीही उपराष्ट्रपतींचे नाव न वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सोशल मिडियावर मीना यांची अचानक वाढलेली लोकप्रियता आणि त्याला लाभलेले कमला हॅरिस कनेक्शनचे वलय याबाबत राष्ट्रपती कार्यालय नाराज असल्याचे दिसत आहे.
मीना हॅरिसची कपड्यांची कंपनी 'फेनोमेनल' ने कमला हॅरिसच्या फोटोचा स्वेटशर्ट्स बाजारात आणला होता, ज्यावर 'व्हाइस प्रेसिडेंट आंटी' लिहिलेले होते. निवडणुकीनंतर मीनावर कमला हॅरिसचे नाव वापरण्यास बंदी घातली गेली. तसेच तिने 'द फर्स्ट बट नॉट द लास्ट' असे नमूद केलेले हेडफोन्स सादर केले होते, ज्यात कमला हॅरिस यांच्या रुपात अमेरिकेला पहिली महिला उपाध्यक्ष मिळाल्याचे म्हटले गेले होते. इशारा देऊनही मीना हॅरिसने शपथविधी सोहळ्यासाठी जाण्यासाठी खासगी विमानाचा वापर केला होता, याचा खर्च एका देणगीदाराने केला होता.
अशा अनेक उदाहरणानंतर आता व्हाईट हाऊसने मीना यांना सक्त ताकीद दिली आहे. लॉस एंजेलिस टाईम्सला दिलेल्या निवेदनात मीना हॅरिसने स्वत: चा बचाव करत म्हटले की, 'मोहिमेच्या सुरूवातीपासूनच मी सर्व कायदेशीर व नैतिक मानक पाळण्याचा आग्रह धरला आहे आणि मी बायडेन/हॅरिस व्हाइट हाऊसच्या नैतिक नियमांचे काटेकोरपणे पालन करत राहीन.’ मीना कमला हॅरिसची बहीण मायाची मुलगी आहे. तिने स्टॅनफोर्ड आणि हार्वर्ड लॉ विद्यापीठात कायद्याचे शिक्षण घेतले आहे.