IPL Auction 2025 Live

Vladimir Putin's Car Attacked: रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या हत्येचा प्रयत्न; कारवर झाला आत्मघातकी हल्ला

दरम्यान, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी बुधवारी रशियन ताब्यापासून नुकत्याच मुक्त झालेल्या इझियम शहराला भेट दिली.

Vladimir Putin | (Photo Credits: Wikimedia Commons)

युक्रेन युद्धादरम्यान रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांच्याबाबत मोठा खुलासा झाला आहे. या खुलाशानंतर रशियात खळबळ उडाली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या गाडीवर बॉम्ब हल्ला करून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. याला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नसला तरी, या वृत्तानंतर राष्ट्रपतींच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रशियन राष्ट्राध्यक्षांच्या कारच्या डाव्या बाजूला 'उच्च स्फोट' झाल्या सांगण्यात आले आणि त्यानंतर संपूर्ण परिसरात धुराचे लोट पसरले.

त्यानंतर घाईघाईत सुरक्षा कर्मचाऱ्यांनी पुतिन यांना लिमोझिन कारमध्ये सुरक्षित बसवले. या घटनेत पुतिन यांना कोणतीही इजा झाली नाही. पुतिन त्यांच्या अधिकृत निवासस्थानी परतत होते, तेव्हा काही किलोमीटरपूर्वी सुरक्षा पथकाची पहिली कार एका रुग्णवाहिकेमुळे थांबली होती. त्यानंतर लगेचच पुतिन यांच्या कारच्या डाव्या बाजूला मोठा आवाज आला आणि त्यातून धूर निघू लागला. यानंतर कारला बॉम्बप्रूफ आणि बुलेटप्रूफ सुरक्षा कर्मचार्‍यांनी घेरले आणि आजूबाजूला पसरलेला धूर काढण्याचे प्रयत्न सुरू झाले.

काही सेकंदातच पुतिन यांना सुरक्षित स्थळी नेण्यात आले. नंतर त्या रुग्णवाहिकेची तपासणी केली असता ड्रायव्हिंग सीटवर एक मृतदेह आढळून आला. पुतिनवर हल्ला करणारी व्यक्ती आत्मघाती हल्लेखोर असल्याचा संशय आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुतिन यांच्या सुरक्षा सेवेतील अनेकांना अटक करण्यात आली आहे. एवढेच नाही तर पुतिन यांच्या आगमनाची माहिती लीक झाल्यानंतर त्यांच्या अनेक अंगरक्षकांना काढून टाकण्यात आले. (हेही वाचा: Volodymyr Zelensky Car Accident: युक्रेनचे पंतप्रधान झेलेन्स्की यांच्या वाहनाला अपघात; कोणतीही गंभीर दुखापत नाही)

रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाला 6 महिन्यांहून अधिक काळ लोटला असताना हल्ल्याची ही बातमी आली आहे. दरम्यान, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी बुधवारी रशियन ताब्यापासून नुकत्याच मुक्त झालेल्या इझियम शहराला भेट दिली आणि ते ताब्यात घेण्याच्या प्रयत्नांबद्दल सैनिकांचे अभिनंदन व आभार मानले. शहरातील सिटी हॉल भस्मसात झाला असला तरी, युक्रेनचा ध्वज आता अभिमानाने त्याच्यासमोर उभा आहे. रशियन सैन्याने गेल्या आठवड्यात हे युद्धग्रस्त शहर सोडले.