Good News! 1 मार्चपासून सुरू होणार 2023 साठीच्या H-1B Visa साठी नोंदणी; जाणून घ्या सविस्तर 

H-1B व्हिसामुळे लोकांना 6 वर्षांपर्यंत अमेरिकेत राहता येते. अमेरिकेतील कंपन्यांना त्यांच्या कार्यालयात कुशल कामगार ठेवण्यासाठी सरकार हा व्हिसा प्रदान करते

Visa | Representational Image | (Photo Credits: PTI)

विशेष कौशल्य असलेल्या परदेशी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यासाठी यूएसमध्ये (US) जारी केलेल्या H-1B व्हिसासाठी (H-1B Visa) नोंदणी 1 मार्चपासून सुरू होणार आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने ही माहिती दिली. H-1B व्हिसाची ही नोंदणी आर्थिक वर्ष 2023 साठी असेल व 18 मार्चपर्यंत नोंदणी प्रक्रिया सुरू राहणार आहे. यूएस सिटिझन्स अँड इमिग्रेशन सर्व्हिस (USCIS), यूएस स्टेट डिपार्टमेंटच्या शाखेने सांगितले की, एच-1बी व्हिसाधारकांना ऑनलाइन एच-1बी नोंदणी प्रणाली वापरून त्यांचा नोंदणी फॉर्म भरावा लागेल आणि सबमिट करावा लागेल.

यूएस सिटिझनशिप अँड इमिग्रेशन सर्व्हिस आर्थिक वर्ष 2023 H-1B कॅपसाठी सबमिट केलेल्या प्रत्येक नोंदणीसाठी एक पुष्टीकरण क्रमांक प्रदान करेल. हा क्रमांक फक्त नोंदणीचा ​​मागोवा घेण्यासाठी वापरला जाईल. केस स्टेटस ट्रॅक करण्यासाठी कोणीही हा नंबर वापरू शकत नाही. अमेरिका ऑक्टोबरमध्ये सुरू होणाऱ्या प्रत्येक आर्थिक वर्षात 65,000 एच-1बी व्हिसा जारी करते. याशिवाय 20 हजार एच-1बी व्हिसा अमेरिकेतच पदवी मिळवणाऱ्या लोकांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. H-1B व्हिसा प्राप्त झालेल्या परदेशी नागरिकांपैकी सुमारे 70 टक्के भारतीय आहेत.

हा व्हिसा बिगर स्थलांतरितांना अमेरिकेत कर्मचारी म्हणून ठेवण्याचा हा एक मार्ग आहे. H-1B व्हिसामुळे लोकांना 6 वर्षांपर्यंत अमेरिकेत राहता येते. अमेरिकेतील कंपन्यांना त्यांच्या कार्यालयात कुशल कामगार ठेवण्यासाठी सरकार हा व्हिसा प्रदान करते. हा व्हिसा मिळवण्यासाठी काही अटीही आहेत. उदाहरणार्थ, कर्मचारी ग्रॅज्युएट असण्यासोबतच त्याने एखाद्या क्षेत्रात कौशल्य प्राप्त केले असावे. याशिवाय कर्मचार्‍यांचे वार्षिक वेतन 40 हजार डॉलर्सपेक्षा जास्त असावे. H-1B व्हिसामुळे अमेरिकेत स्थायिक होणेही सोपे होते. H-1B व्हिसाधारक 5 वर्षांनंतर कायमस्वरूपी यूएस नागरिकत्व किंवा ग्रीन कार्डसाठी अर्ज करू शकतात. (हेही वाचा: Joe Biden Insults Journalist: पत्रकाराने विचारलेल्या महागाईच्या प्रश्नानांवर भडकले राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, पत्रकाराला केली शिवीगाळ)

संभाव्य H-1B व्हिसा अर्जदारांच्या निवड प्रक्रियेसाठी प्रत्येक लाभार्थीची इलेक्ट्रॉनिक पद्धतीने नोंदणी करण्यासाठी प्रत्येक लाभार्थ्याने myUSCIS ऑनलाइन खाते वापरणे आवश्यक आहे. प्रत्येक लाभार्थ्याने सबमिट केलेल्या प्रत्येक नोंदणीसाठी $10 H-1B नोंदणी शुल्क भरणे आवश्यक आहे.