Dawood Ibrahim Test Positive for Coronavirus: अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम व पत्नी महजबीनला कोरोना व्हायरसची लागण; उपचारासाठी कराचीच्या मिलिटरी इस्पितळात दाखल- Reports
आता त्यात आणखी एक नाव जोडले गेले आहे, प्रसिद्ध अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला (Dawood Ibrahim) कोरोना विषाणूची लागण झाली आहे.
जगातील अनेक प्रसिद्ध व्यक्तींना कोरोना विषाणूची (Coronavirus) लागण झाल्याची प्रकरणे याआधी समोर आली आहेत. आता त्यात आणखी एक नाव जोडले गेले आहे, प्रसिद्ध अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला (Dawood Ibrahim) कोरोना विषाणूची लागण झाली आहे. माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार पाकिस्तान (Pakistan) मधील काही महत्वाच्या सरकारी सूत्रांनी या घटनेची पुष्टी केली आहे. या घटनेनंतर दाऊदचे सुरक्षारक्षक व इतर कर्मचारी अशा अनेकांना वेगळे ठेवण्यात आले आहे. यासोबतच दाऊदची पत्नी महजबीनही (Mahzabeen) कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे.
सध्या या दोघांनाही कराचीच्या (Karachi) मिलिट्री रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, मात्र पाकिस्तानकडून वारंवार या गोष्टीबाबत नकार दिला जात आहे. मुंबई हल्ल्याचा मुख्य सूत्रधार दाऊद इब्राहिम बराच काळ पाकिस्तानमध्ये लपला होता. मात्र पाकिस्तानने ही गोष्ट मान्य केली नाही. मात्र आता काही महत्वाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही बातमी पूर्णपणे सत्य आहे व दाऊद आणि त्याची पत्नी यांना मिलिटरी इस्पितळात उपचारासाठी नेण्यात आले आहे. दाऊदच्या घरी काम करत असलेल्या अनेक लोकांनाही क्वारंटाईन करण्यात आले आहे. याधीही अनेकवेळा दाऊद आजारी असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. (हेही वाचा: कोरोना व्हायरस संक्रमितांचा जगभरातील आकडा 66 लाखांच्या पार, आतापर्यंत 3.99 लाख मृत्यू)
भारत आणि अमेरिकेने 2003 मध्ये दाऊदला जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केले होते. 1993 च्या बॉम्बस्फोटांमधील त्याच्या सहभागाबद्दल त्याच्यावर सध्या 25 मिलियन अमेरिकन डॉलर्स इतके बक्षीस आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी म्यानमार (Myanmar) मध्ये सिंथेटिक ड्रग्जची (Drug) मोठी खेप जप्त केली गेली होती. आशिया (Asia) मध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त केल्याचे वृत्त आहे. यामध्ये कराचीस्थित अंडरवर्ल्ड नेटवर्क डी-कंपनी (D-Company) सामील असल्याचे संकेत मिळाले आहेत.