Russia Ukraine War: युक्रेनचे रशियामध्ये अनेक ठिकणी ड्रोन हल्ले, मॉस्को परिसरात चार ड्रोन पाडले
मॉस्को परिसरात चार ड्रोन पाडले गेले. तर, युक्रेनच्या सीमेपासून 800 किमी अंतरावर असलेल्या यारोस्लाव्हल प्रांतातही ड्रोनचे हल्ले झाले.
रशियामध्ये अध्यक्ष निवडीसाठीच्या मतदानाची प्रक्रिया संपत असतानाच युक्रेनने मॉस्को आणि इतर शहरांच्या परिसरात अनेक ड्रोनद्वारे हल्ला केला. यावेळी रशियाने देखील जोरदार प्रत्यूत्तर दिले आहे. रशियाच्या हवाई संरक्षण विभागाने सुमारे 35 ड्रोन हवेतच नष्ट केले. या हल्ल्यात जीवित हानी झाली नसल्याचा दावा रशियाने केला आहे. रशियामधील निवडणुकीचा निकाल जवळपास स्पष्ट असून विद्यमान अध्यक्ष व्लादीमिर पुतीन यांना आणखी सहा वर्षांचा कार्यकाळ मिळणार आहे. शुक्रवारपासून सुरू झालेली मतदानाची प्रक्रिया आज संपली. (हेही वाचा - Donald Trump Warns Bloodbath: 'यूएस अध्यक्षपदी निवड न झाल्यास रक्तपात करेन', डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा)
युक्रेनने आज रशियातील विविध ठिकाणी ड्रोनद्वारे हल्ले केले. मॉस्को परिसरात चार ड्रोन पाडले गेले. तर, युक्रेनच्या सीमेपासून 800 किमी अंतरावर असलेल्या यारोस्लाव्हल प्रांतातही ड्रोनचे हल्ले झाले. रशियात इतक्या आतपर्यंत ड्रोनद्वारे हल्ला होण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे युक्रेनी अधिकाऱ्यांनी सांगितले. रशियाने बेलगोरोद, कुर्स्क आणि रोस्तोव या युक्रेनच्या सीमेला लागून असलेल्या प्रांतांमध्ये ड्रोन हवेतच नष्ट केले. ड्रोन हल्ल्यात एकाही व्यक्तीचा मृत्यू झाला नसल्याचा दावा रशियाने केला आहे.
क्रास्नोदर प्रांतात एका तेलशुद्धीकरण कारखान्यावर कोसळणारा ड्रोन पडून आग लागली. अनेक तासांच्या प्रयत्नांनंतर ती नियंत्रणात आणण्यात यश आले. युक्रेनने हल्ला करताना रशियातील तेलशुद्धीकरण कारखान्यांना प्रथमपासूनच लक्ष्य केले आहे. युक्रेनकडून हल्ले वाढल्याने सीमेनजीक असलेल्या बोलगोरोद आणि परिसरातील सर्व शाळा, महाविद्यालये आणि मॉल बंद ठेवण्याचे आदेश रशिया सरकारने दिले आहेत. युक्रेनने या शहरावर अनेकवेळा हल्ले केले आहेत.