Traffic Jams in Paris: फ्रांसमध्ये दुसऱ्या लॉक डाऊनच्या घोषणेनंतर राजधानी पॅरिसमध्ये तब्बल 700 किमीचे ट्राफिक जाम (Watch Video)
अलिकडच्या काळात फ्रान्समध्ये कोरोना संक्रमणाच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे.
फ्रान्ससह (France) युरोपमधील बर्याच देशांमध्ये कोरोना व्हायरस (Coronavirus) महामारीची दुसरी लाट सुरू होणार असल्याचे सांगितले जात आहे. अलिकडच्या काळात फ्रान्समध्ये कोरोना संक्रमणाच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत फ्रान्स सरकारने पुन्हा एकदा देशात लॉकडाऊन (Lockdown) जाहीर केला. लॉक डाऊनच्या घोषणेमुळे गुरुवारी फ्रान्सच्या रस्त्यावर वाहतूक कोंडी (Traffic Jams) झाली होती. आपल्या घरी लवकरात लवकर पोहोचण्यासाठी मोठ्या संख्येने लोक आपापल्या वाहनांनी प्रवास करीत होते. परिणामी गुरुवारी संध्याकाळी राजधानी पॅरिसच्या (Paris) भागात 700 किमी लांबीचे ट्राफिक जाम झाले होते.
कोरोनामुळे जेव्हा युरोपमध्ये प्रथम लॉकडाउन जाहीर झाला तेव्हा लोक कित्येक आठवड्यांपर्यंत त्यांच्या घरात बंद होते. आता दुसऱ्या लॉक डाऊनच्या घोषणेनंतर, ट्राफिक जामचे दुसरे मोठे कारण म्हणजे, या विकेंडला असणारा सेंट्स डे हॉलीडे हे होय. या दिवसांमध्ये सुट्टी असल्याने मोठ्या संख्येने लोक घराबाहेर पडले होते व लॉक डाऊनच्या घोषणेनंतर सर्वांनाच घरी जायचे होते. यासह अनेक लोकांना त्यांच्या गावी परत जायचे होते. फ्रान्समध्ये वाढत्या कोरोना संसर्गाचा परिणाम देशाच्या आरोग्य यंत्रणेवर होईल याची चिंता वाढत होती. त्यामुळे अधिकाऱ्यांनी शुक्रवारपासून चार आठवड्यांच्या लॉकडाऊनचे आदेश दिले.
पहा व्हिडिओ -
याकाळातील सर्वात व्यस्त ठिकाणे होती ती म्हणजे किराणा दुकान आणि बाजारपेठ. पुढच्या एक महिन्यासाठी लोकांना अन्न आणि इतर वस्तूंचा साठा करायचा होता, म्हणूनही अनेक लोक घराबाहेर पडले होते. फ्रान्समधील सर्व 6.7 कोटी लोकांना पुढच्या एक महिन्यासाठी घरी राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यावेळी, कोणीही कोणाच्या घरी जाऊ शकत नाही. परंतु घराच्या 1 किलोमीटरच्या परिसरामध्ये व्यायामासाठी एका तासाची परवानगी देण्यात आली आहे. याशिवाय कामाची ठिकाणे, जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी तसेच रुग्णालयांमध्ये जाण्याची परवानगी आहे. (हेही वाचा: तुर्की भुकंपामुळे हादरला, इमारती कोसळण्यासह 17 जणांचा बळी तर जवळजवळ 700 हून अधिक जण जखमी)
रेस्टॉरंट्स आणि कॅफे बंद केले आहेत. पंतप्रधान जीन कॅस्टेक्स यांनी गुरुवारी सांगितले की, ‘मित्रांच्या घरी जाणे, मित्रांना भेट देणे आणि विहित कारणांशिवाय इतर कशासाठीही फिरणे अशक्य आहे.’ दरम्यान, शुक्रवारी जाहीर केलेल्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यापासून फ्रांसमध्ये एकूण कोरोना रूग्णांची संख्या 1,331,984 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत आणखी 256 लोकांचा मृत्यू झाला आहे आणि अशाप्रकारे कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 36,565 वर पोहोचली आहे.