TIME Person of the Year: टेस्लाचे Elon Musk ठरले यंदाचे टाइम 'पर्सन ऑफ द इयर'; 4 लस शास्त्रज्ञ ‘Heroes of the Year’ ने सन्मानित

नंतर प्रत्येक क्षेत्रात महिलांचा वाढता सहभाग लक्षात घेऊन मासिकाने याचे नाव बदलून 'पर्सन ऑफ द इयर' असे करण्यात आले

Elon Musk (Photo Credits: Getty Images)

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाचे (Tesla) मालक इलॉन मस्क (Elon Musk) यांच्या नावावर आणखी एक मोठी कामगिरी नोंदवण्यात आली आहे. इलॉन मस्क यांना टाइम मॅगझिनने ‘पर्सन ऑफ द इयर’ (TIME Person of the Year) घोषित केले आहे. टाईम मॅगझिनतर्फे दरवर्षी हा किताब बहाल केला जातो, यंदा तो इलॉन मस्क यांना देण्यात आला आहे. टाइम्स पर्सन ऑफ द इयर ही पदवी जगभरातील व्यक्ती किंवा संस्थेच्या प्रभावाचे प्रतीक मानली जाते.

टाइमचे मुख्य संपादक एडवर्ड फेलसेन्थल यांनी म्हटले आहे की, 'पर्सन ऑफ द इयर हा किताब एखाद्या व्यक्तीचा प्रभाव दर्शवितो आणि पृथ्वीवरील जीवनावर किंवा पृथ्वीच्या बाहेरील जीवनावर असा प्रभाव पाडणारे फार कमी लोक आहेत'. 2021 मध्ये, इलॉन मस्क केवळ जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून उदयास आले नाहीत, तर आपल्या समाजातील बदलाचे सर्वात मोठे उदाहरण देखील ठरले आहेत. SpaceX चे संस्थापक आणि CEO एलोन मस्क हे ब्रेन चिप स्टार्टअप न्यूरालिंक आणि इन्फ्रास्ट्रक्चर फर्म द बोरिंग कंपनीचेही नेतृत्व करत आहेत. टेस्लाचे बाजारमूल्य एक ट्रिलियन डॉलर्सपेक्षा जास्त झाले आहे.

यासोबतच लस शास्त्रज्ञ हे यंदाचे टाईमचे ‘Heroes of the Year’ ठरले आहेत. किझमेकिया कॉर्बेट, बार्नी ग्रॅहम, कॅटालिन कारिको आणि ड्र्यू वेसमन असे हे चार लस शास्त्रज्ञ आहेत. सोबत, एथलिट ऑफ द इयरचा किताब सिमोन बायल्स (Simone Biles) ला तर, एन्टरटेनर ऑफ द इयरचा किताब लिव्हिया रॉड्रिगो (Olivia Rodrigo) हिला देण्यात आला आहे. (हेही वाचा:  इस्रायलचे Tev Aviv ठरले जगातील सर्वात महागडे शहर; स्वस्त शहरांच्या यादीत भारताच्या Ahmedabad चा समावेश)

दरम्यान, 1927 पासून टाइम मासिक 'मॅन ऑफ द इयर' ही पदवी देत आहे. नंतर प्रत्येक क्षेत्रात महिलांचा वाढता सहभाग लक्षात घेऊन मासिकाने याचे नाव बदलून 'पर्सन ऑफ द इयर' असे करण्यात आले. 2020 मध्ये अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन आणि कमला हॅरिस यांना संयुक्तपणे टाइम पर्सन ऑफ द इयर म्हणून गौरविण्यात आले.