TikTok Benadryl Challenge: टिकटॉकवरील धोकादायक 'बेनाड्रिल चॅलेंज’मध्ये अल्पवयीन मुलाचा मृत्यू; FDA ने दिली ड्रग्जच्या ओव्हरडोज विरुद्ध चेतावणी
यूएस फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशनने (FDA) टिकटॉकवरील ‘बेनाड्रील चॅलेंज’शी संबंधित ओव्हरडोज विरुद्ध चेतावणी दिली आहे.
टिकटॉकवर (TikTok) व्हायरल होत असलेल्या चॅलेंजचा प्रयत्न करत असताना अमेरिकेतील ओहायोच्या एका किशोरवयीन मुलाचा ओव्हर-द-काउंटर औषधांच्या ओव्हरडोजमुळे दुःखद मृत्यू झाला आहे. या 13 वर्षीय पीडित जेकब स्टीव्हन्सने (Jacob Stevens) ‘बेनाड्रिल चॅलेंज’ (Benadryl Challenge) मध्ये भाग घेतला होता. भ्रम निर्माण करण्यासाठी त्याने अंदाजे 12 ते 14 अँटीहिस्टामाइन्स घेतल्या. यूएस ब्रॉडकास्टर्सच्या मते, जेकबने घेतलेला डोस शिफारस केलेल्या डोसपेक्षा जवळजवळ सहा पट जास्त होता, ज्यामुळे प्राणघातक स्टंट दरम्यान आरोग्याच्या समस्या निर्माण होऊन त्याचा मृत्यू झाला.
टिकटॉकवरील हा ट्रेंड 2020 मध्ये अमेरिकन किशोरवयीन मुलांमध्ये लोकप्रिय झाला होता. टिकटॉकवर लोकप्रियता मिळवण्यासाठी अशा जीवघेण्या आव्हानाचा प्रयत्न करणारे अनेक किशोरवयीन त्यांचे व्हिडिओ अपलोड करतात. जेकबचे वडील, जस्टिन यांनी एबीसी 6 ला एका टेलिव्हिजन स्टेटमेंटमध्ये सांगितले की त्यांच्या मुलाने गेल्या आठवड्याच्या शेवटी मित्रांसह घरी ड्रग्जचा ओव्हरडोज घेतला.
डझनभर गोळ्या खाल्ल्यानंतर, जेकबला ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आले आणि यांत्रिक वेंटिलेशनवर ठेवण्यात आले. व्हेंटिलेटरवर जवळजवळ एक आठवडा घालवल्यानंतर, जेकब स्टीव्हन्सचे सहाव्या दिवशी निधन झाले. जेकबच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबाने इतर पालकांना त्यांच्या मुलांना अशा जीवघेण्या चॅलेंजपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे. जेकबच्या वडिलांनी इतर पालकांना आवाहन केले की, कोणतीही दुर्घटना टाळण्यासाठी त्यांची त्यांच्यामुलांच्या ऑनलाइन क्रियाकलापांवर लक्ष ठेवावे. (हेही वाचा: Sexual Abuse: मुलांना बोलवायचे, आमिष दाखवायचे आणि नंतर संबंध बनवायचे; 6 महिला शिक्षक अटकेत)
बेनाड्रिल सारखे औषध खरेदी करण्यावर वय-संबंधित निर्बंध आणण्यासाठीदेखील त्यांनी स्थानिक खासदारांशी संपर्क साधला आहे. यूएस फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशनने (FDA) टिकटॉकवरील ‘बेनाड्रील चॅलेंज’शी संबंधित ओव्हरडोज विरुद्ध चेतावणी दिली आहे. बेनाड्रील या औषधामध्ये डायफेनहायड्रॅमिन असते. हे एक अँटीहिस्टामाइन आहे जे ताप, सर्दी, अप्पर रेस्पीरेटरी ऍलर्जी किंवा तत्सम लक्षणांपासून आराम देते. डिफेनहायड्रॅमिनचा लहान डोस हा ‘सुरक्षित आणि प्रभावी’ मानला जातो. मात्र, हे जास्त प्रमाणात घेतल्यास हृदयाची गुंतागुंत, फेफरे, कोमा किंवा मृत्यू देखील होऊ शकतो.