Sri Lanka Economic Crisis: श्रीलंकेमध्ये स्वातंत्र्यानंतरचे सर्वात मोठे आर्थिक संकट; दुध 263 रुपये लिटर, तांदूळ 500 रुपये किलो

अशाप्रकारे दक्षिण आशियाई राष्ट्र श्रीलंका स्वातंत्र्यानंतरच्या सर्वात वाईट आर्थिक मंदीचा सामना करत आहे.

Sri Lanka Economic Crisis (संग्रहित संपादित प्रतिमा)

शेजारील देश श्रीलंका (Sri Lanka) गेल्या काही काळापासून गंभीर आर्थिक संकटाचा (Economic Crisis) सामना करत आहे. जवळजवळ संपलेला परकीय चलनाचा साठा आणि कर्जाचा प्रचंड बोजा यामुळे श्रीलंकेवर दिवाळखोरीचा धोका निर्माण झाला आहे. डॉलरच्या तुलनेत श्रीलंकेच्या चलनाचे मूल्य जवळपास निम्म्यावर आले आहे, त्यामुळे अनेक महत्त्वाच्या वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. डिझेल-पेट्रोल, गॅस खरेदीसाठी लांबच लांब रांगा लागल्या आहेत. परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की साखरेचा भाव 290 रुपये किलो आणि तांदूळ 500 रुपये किलो झाला आहे.

सरकारी आकडेवारीनुसार, श्रीलंकेतील महागाईचा दर आता 17 टक्क्यांच्या पुढे गेला आहे. संपूर्ण दक्षिण आशियातील कोणत्याही देशातील महागाईची ही सर्वात वाईट पातळी आहे. त्यामुळे श्रीलंकेसमोर स्वातंत्र्यानंतरचे सर्वात गंभीर संकट उभे राहिले आहे. सध्या या छोट्या देशाची अवस्था अशी आहे की, लोकांना 1 कप चहासाठी 100 रुपये मोजावे लागत आहेत. एवढेच नाही तर ब्रेड, दूध यासारख्या जीवनावश्यक वस्तूंचे भावही गगनाला भिडले आहेत.

बातमीनुसार, श्रीलंकेत ब्रेडच्या एका पॅकेटची किंमत आता 150 रुपये झाली आहे. दुधाची पावडर 1,975 रुपये प्रति किलो असेल, तर एलपीजी सिलेंडरची किंमत 4,119 रुपये आहे. त्याचप्रमाणे पेट्रोल 254 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 176 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. श्रीलंकेचे चलन आणि अर्थव्यवस्थेच्या या दुर्दशेचे कारण ‘प्रचंड कर्ज’ हे आहे. श्रीलंकेचा परकीय चलनाचा साठा संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे.

श्रीलंकेत तीन वर्षांपूर्वी नवीन सरकार स्थापन झाले तेव्हा परकीय चलनाचा साठा $7.5 अब्ज होता. त्यात झपाट्याने घट झाली आणि जुलै 2021 मध्ये ती $2.8 अब्ज इतकी कमी झाली. गेल्या वर्षी नोव्हेंबरपर्यंत ते आणखी घसरून $1.58 बिलियनच्या पातळीवर आले होते. परकीय कर्जाचा डोंगर, सतत लागू असलेले लॉकडाऊन, वाढती महागाई, इंधन पुरवठ्यातील तुटवडा, परकीय चलन साठ्यात झालेली घसरण आणि चलनाचे अवमूल्यन यामुळे देशाच्या आर्थिक विकासावर विपरित परिणाम झाला आहे. (हेही वाचा: China Covid Cases: चीनमध्ये 2 वर्षांत प्रथमच सर्व 31 राज्यांमध्ये पसरला कोरोना, 5 शहरांमध्ये पूर्ण लॉकडाऊन)

गुरुवारी संपूर्ण श्रीलंकेत डिझेलची विक्री झाली नाही, ज्यामुळे संकटग्रस्त देशातील 22 दशलक्ष लोकांची वीज खंडित झाली, तसेच त्याचा वाहतुकीवरही परिणाम झाला. अशाप्रकारे दक्षिण आशियाई राष्ट्र श्रीलंका स्वातंत्र्यानंतरच्या सर्वात वाईट आर्थिक मंदीचा सामना करत आहे.