SCO Summit: दहशतवादाला पाठीशी घालणा-यांवर कारवाई होण्याची गरज, पंतप्रधान मोदींनी इमरान खान यांच्यासमोर पाकला लगावला टोला
पाकिस्तानला हे खडे बोल सुनवत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान देखील उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी SCO समिट च्या दुस-या दिवशी सुद्धा पाकिस्तानच्या प्रधानमंत्री इमरान खान सोबत थोडे अंतर ठेवण्यातच समाधान मानले. आज SCO समिट चे फोटो सेशन झाले. मात्र इमरान खान (Imran Khan) आणि नरेंद्र मोदी यांनी एकमेकांपासून बरेच अंतर ठेवले होते. या बैठकीत पंतप्रधान मोदींनी समाजाला दहशतवादातून मुक्त करायचे असेल, तर मानवतावादी शक्तींनी एकजूट व्हावे लागेल असे संबोधित केले.
SCO देशांना मिळून दहशतवादाला मुळासकट नष्ट करायला हवं. तसेच दहशतवादाविरोधात आंतरराष्ट्रीय संमेलन असले पाहिजे. यासाठी लोकांनी एकमेकांशी संपर्क साधणे जरुरीचे आहे असेही ते पुढे म्हणाले. पाकिस्तान सतत भारतासोबत चर्चा करण्यासाठी अपील करत आहे. मात्र चर्चा आणि आतंकवाद ह्या गोष्टी एकत्र होऊ शकत नाही, अशा कडक शब्दात त्यांनी पाकिस्तानला खडसावले. भारताचे अशे म्हणणे आहे की, पाकिस्तानने सर्वात आधी त्यांच्या मातृभूमीवर असलेल्या दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाई केली पाहिजे. पाकिस्तानला हे खडे बोल सुनवत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान देखील उपस्थित होते.
गुरुवारी झालेल्या रात्रीच्या जेवणावेळीही मोदींनी इमरान खान यांच्याशी बोलणे टाळले. एकाच ठिकाणी जेवायला बसलेल्या दोन दिग्गज नेत्यांनी एकमेकांशी बोलणे टाळले हे अनेकांना दिसून आले.
हेही वाचा- इमरान खान यांचं नरेंद्र मोदी यांना पत्र, भारत पाक संबंध सुधारण्यासाठी चर्चेची मागणी
पंतप्रधान मोदी दोन दिवसांच्या एससीओ संमेलनासाठी गुरुवारी बिश्केक पोहोचले होते. SCO चीन चे नेतृत्व असलेला 8 दिवसीय आर्थिक आणि सुरक्षा समूह आहे. ज्यात भारत आणि पाकिस्तान या देशांना 2017 मध्ये समाविष्ट केले होते.