Saudi Arabia School Rule: सौदी अरेबियामध्ये अजब फर्मान; मुले शाळेत न गेल्यास पालकांना होऊ शकतो तुरुंगवास, जाणून घ्या सविस्तर
15 दिवसांच्या गैरहजेरीनंतर विद्यार्थ्याला शिक्षण विभागामार्फत दुसऱ्या शाळेत स्थानांतरित केले जाईल.
सौदी अरेबियामध्ये (Saudi Arabia) आता मुलांचे शाळेत न जाणे ही त्यांच्या पालकांसाठी मोठी समस्या ठरू शकते. सौदी अरेबियाच्या शिक्षण मंत्रालयाने गुरुवारी सांगितले की, जे विद्यार्थी 20 दिवस कोणत्याही कारणाशिवाय शाळेत गैरहजर राहतील त्यांच्या पालकांना अधिकारी तुरुंगात टाकू शकतात. सौदी अरेबियास्थित वृत्तसंस्था मक्का न्यूजपेपरने एका वृत्तात म्हटले आहे की, जर एखादा विद्यार्थी 20 दिवस शाळेत गेला नाही तर, विद्यार्थ्याच्या पालकांना राज्याच्या बाल संरक्षण कायद्यांतर्गत असलेल्या सार्वजनिक अभियोग कार्यालयात पाठवण्याची जबाबदारी शाळेची आहे.
त्यानंतर पब्लिक प्रोसिक्युशन ऑफिस याबाबतच्या तपासाला अंतिम स्वरूप देईल व अशी केस फौजदारी न्यायालयाकडे पाठवेल. विद्यार्थ्याची शाळेतील अनुपस्थिती ही त्यांच्या पालकांच्या निष्काळजीपणामुळे होत होती हे सिद्ध झाल्यास, न्यायाधीशांना वाजवी कालावधीसाठी पालकांना तुरुंगवासाची शिक्षा देण्याचा अधिकार असेल.
अहवालानुसार, विद्यार्थ्याच्या 20 दिवसांपेक्षा जास्त असलेल्या अनुपस्थितीबाबत शाळेच्या मुख्याध्यापकांना शिक्षण मंत्रालयाला कळवावे लागेल, जे याची चौकशी सुरू करतील आणि विद्यार्थ्याला फॅमिली केअर सेंटरमध्ये स्थानांतरित करण्याचे आदेश देतील. तिथे विद्यार्थ्यासोबत या प्रकरणाची चौकशी केली जाईल. प्रक्रियेनुसार, विद्यार्थ्याने 3 दिवसांची सुट्टी घेतल्यास, त्याला इशारा दिला जाईल. विद्यार्थ्याने 5 दिवस सुट्टी घेतल्यानंतर, दुसरी चेतावणी जारी केली जाईल आणि पालकांना सूचित केले जाईल. (हेही वाचा: Girlfriend हत्या प्रकरणात प्रियकर दोषी, US कोर्टाने ठोठावली 60 वर्षे तुरुंगवासाची शिक्षा)
त्याचप्रमाणे 10 दिवसांच्या अनुपस्थितीनंतर, तिसरी चेतावणी जारी केली जाईल आणि त्याच्या पालकांना शाळेत बोलावले जाईल आणि त्यांना हमीपत्रावर स्वाक्षरी घ्यावी लागेल. 15 दिवसांच्या गैरहजेरीनंतर विद्यार्थ्याला शिक्षण विभागामार्फत दुसऱ्या शाळेत स्थानांतरित केले जाईल. 20 दिवसांत शिक्षण विभाग बाल संरक्षण कायद्यातील तरतुदी लागू करणार आहे.