Russia-Ukraine Grain Deal: पाच महिन्यांच्या युद्धानंतर प्रथमच रशिया-युक्रेनमध्ये धान्य करार; जगाला मिळू शकतो महागाईपासून दिलासा

हे दोन देश जगातील 24 टक्के गव्हाची गरज भागवतात. एवढेच नाही तर रशिया-युक्रेन जगातील सूर्यफूल तेलाची 57 टक्के गरज भागवतात.

António Guterres and Recep Tayyip Erdogan (संग्रहित संपादित प्रतिमा)

रशिया (Russia) आणि युक्रेनमधील (Ukraine) युद्ध सुरू होऊन जवळपास पाच महिने झाले आहेत. मात्र, आतापर्यंत कोणत्याही एका मुद्द्यावर दोन्ही देशांमध्ये करार झालेला नव्हता. आता जवळजवळ 150 दिवसांनंतर, संयुक्त राष्ट्रांच्या मध्यस्थीनंतर दोन्ही देशांनी काळ्या समुद्रातून धान्याची निर्यात सुरू ठेवण्याचा करार केला आहे. या करारामुळे रशिया यापुढे युक्रेनच्या बंदरांमधून निघालेली धान्याने भरलेली जहाजे थांबवणार नाही. दोन्ही देशांनी घेतलेल्या या निर्णयामुळे कदाचित जगातील वाढते अन्न संकट टाळता येईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

तुर्कस्तानमधील डोल्माबाच पॅलेसमध्ये दोन्ही देशांमधील या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या बैठकीला संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस आणि तुर्कीचे अध्यक्ष तय्यप रजाब एर्दोआनही उपस्थित होते. या बैठकीनंतर गुटेरेस म्हणाले की, या करारामुळे युक्रेनमधून खाद्यपदार्थांच्या निर्यातीचा मार्ग मोकळा झाला आहे. याद्वारे विकसनशील देशांना अन्न आणि आर्थिक संकटातून बाहेर काढता येईल.

रशिया आणि युक्रेनमध्ये यावर्षी फेब्रुवारीपासून युद्ध सुरू आहे. रशियाने युक्रेनची  अनेक महत्त्वाची तळे ताब्यात घेतली आहेत. यामध्ये काळ्या समुद्राशी जोडलेल्या अनेक महत्त्वाच्या ठिकाणांचा समावेश आहे. याशिवाय युक्रेनच्या अनेक महत्त्वाच्या बंदरांवर रशियाने एकतर कब्जा केला आहे किंवा त्यावर हल्ले सुरूच ठेवले आहेत. अशा परिस्थितीत युक्रेनमधून अन्नधान्याच्या निर्यातीवर सुमारे पाच महिन्यांसाठी बंदी घालण्यात आली आहे. हा गतिरोध संपवण्यासाठी संयुक्त राष्ट्र आणि तुर्कीने रशिया-युक्रेन यांच्यात चर्चा सुरू करण्याचा आग्रह धरला होता. (हेही वाचा: कोरोनानंतर आता प्राणघातक 'मारबर्ग विषाणू'चे थैमान; 2 पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू, जाणून घ्या लक्षणे)

रशियाच्या अशा करतुदीमुळे जगभरात मंदी आली आहे, यामुळे अन्नधान्याच्या किंमती वाढल्या आहेत. जगभरातील खाद्यपदार्थांच्या किमतींचा मागोवा घेणाऱ्या आंतरराष्ट्रीय अन्न आणि कृषी संघटनेनुसार (FAO) 32 वर्षात खाद्यपदार्थांच्या किमती सर्वाधिक वाढल्या आहेत. रशिया आणि युक्रेनमधील युद्ध सुरू झाल्यापासून कीवची निर्यात ठप्प आहे. दुसरीकडे पाश्चात्य देशांनी रशियावर प्रचंड निर्बंध लादले आहेत. त्यामुळे युक्रेन तसेच रशियाकडून होणारी निर्यात घटली आहे. बहुतेक देश रशियाकडून थेट खरेदी टाळत आहेत. अशा परिस्थितीत अन्नधान्य महागाई सर्वोच्च पातळीवर आहे.

अन्नधान्याच्या निर्यातीच्या बाबतीत हे दोन्ही देश शक्तीशाली आहेत. हे दोन देश जगातील 24 टक्के गव्हाची गरज भागवतात. एवढेच नाही तर रशिया-युक्रेन जगातील सूर्यफूल तेलाची 57 टक्के गरज भागवतात. यूएन कॉमट्रेडच्या मते, हे दोन देश 2016 ते 2020 पर्यंत जगातील 14 टक्के कॉर्न निर्यातीसाठी जबाबदार होते. पण रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून निर्यात थांबली व त्यामुळे अनेक देशांना खाद्यपदार्थांच्या तुटवड्याचा सामना करावा लागला आहे.