Russia: रशियामधून बाहेर पाडण्यासाठी नागरिकांचा आटापिटा; विमान तिकिटासाठी मोजत आहेत तब्बल 22 लाख रुपये, जाणून घ्या कारण

गेल्या आठवड्यात बुधवारी अध्यक्ष पुतिन यांनी ‘आंशिक जमावबंदी जाहीर केल्यापासून रशिया सोडणाऱ्यांची संख्या वाढली आहे. रशियातून पळून जाण्याच्या प्रयत्नात, कझाकस्तान, फिनलंड आणि मंगोलियाकडे जाणार्‍या रशिया-जॉर्जिया सीमेवर लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

Vladimir Putin | (Photo Credits: Facebook)

रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेले युद्ध (Russia Ukraine War) थांबण्याचे नाव घेत नाही. अशात रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी अणुयुद्ध सुरू करण्याची धमकी देऊन, 3 लाख राखीव सैनिकांची भरती करण्याची घोषणा केल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून देशात खळबळ उडाली आहे. मोठ्या संख्येने लोक रशिया सोडून पळून जाण्याचा प्रयत्न करत आहेत. हजारो लोक पळून जाण्यात यशस्वी झाले, परंतु अजूनही अशा लोकांची संख्या लाखोंच्या घरात आहे ज्यांना देशातून बाहेर पडायचे आहे. या पार्श्वभुमीवर रशियातील विमान सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांवर मोठा तणाव आहे.

रशिया लवकरच युद्ध लढणार्‍या पुरुषांच्या देशाबाहेर जाण्यावर बंदी घालणार असल्याच्या वृत्तांदरम्यान आता खाजगी विमानांमधील सीट्सच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. पुतिन यांच्या घोषणेपासून देशात अराजकतेची स्थिती निर्माण झाली आहे. देशातील श्रीमंत नागरिक आर्मेनिया, तुर्की आणि अझरबैजान येथे जाण्यासाठी खाजगी विमानांची मदत घेत आहेत आणि यासाठी ते सीट बुकिंगसाठी जादा किमती देखील मोजत आहेत. हे देश रशियन लोकांना प्री-व्हिसा प्रवेशाची परवानगी देतात.

देशाबाहेर जाण्यासाठी खाजगी विमानांची प्रचंड मागणी पाहता या विमानांमधील सीटची किंमत आता £20,000 ते £25,000 (अंदाजे रु. 17.63 लाख ते रु. 22.04 लाख) दरम्यान आहे. द गार्डियनने दिलेल्या वृत्तानुसार, आठ आसनी खाजगी जेट भाड्याने देण्याची किंमत £80,000 ते £140,000 (₹70.56 दशलक्ष ते ₹1.23 कोटी) दरम्यान असते. ब्रोकर जेट कंपनी युवर चार्टरचे संचालक येवगेनी बायकोव्ह म्हणाले, ‘सध्याची परिस्थिती बिकट आहे, याआधी आम्हाला एका दिवसात साधारण 50 अर्ज मिळत होते, आता त्यांच्या संख्या वाढून जवळपास 5,000 झाली आहे.’

चार्टर्ड व्यावसायिक विमानातील सर्वात स्वस्त सीटची किंमत £3,000 (रु. 2,64,470) असल्याचे बायकोव्ह यांनी सांगितले. आणखी एका खासगी जेट कंपनी फ्लायवेने सांगितले की, आर्मेनिया, तुर्की, कझाकस्तान आणि दुबईसाठी एकेरी उड्डाणांची मागणी 50 पटीने वाढली आहे. अशात रशियामध्ये वापरण्यासाठी विमान भाड्याने देण्यासाठी मनाई करणार्‍या युरोपियन युनियन आणि यूकेने लादलेल्या निर्बंधांमुळे भाड्याने विमानांच्या उपलब्धतेवर गंभीर परिणाम झाला आहे. आता पुरवठ्यापेक्षा मागणी जास्त आहे आणि सहा महिन्यांपूर्वीच्या तुलनेत किमती गगनाला भिडल्या आहेत. (हेही वाचा: रशियामध्ये 18-65 वयोगटातील पुरुषांना विकली जाणार नाहीत विमान तिकिटे; Vladimir Putin यांच्या इशाऱ्यानंतर निर्णय, जाणून घ्या कारण)

गेल्या आठवड्यात बुधवारी अध्यक्ष पुतिन यांनी ‘आंशिक जमावबंदी जाहीर केल्यापासून रशिया सोडणाऱ्यांची संख्या वाढली आहे. रशियातून पळून जाण्याच्या प्रयत्नात, कझाकस्तान, फिनलंड आणि मंगोलियाकडे जाणार्‍या रशिया-जॉर्जिया सीमेवर लांबच लांब रांगा लागल्या आहेत. रशियाने अद्याप आपल्या सीमा बंद केल्या नाहीत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement