Russia Ban Flights: रशियाने ब्रिटन आणि जर्मनीसह 36 देशांच्या विमान कंपन्यांच्या उड्डाणांवर घातली बंदी
या निर्बंधांमुळे विमान कंपन्यांना काही मार्गांवर जास्त वळसा घालावा लागेल. त्यामुळे तिकिटांची किंमत वाढण्याची शक्यता आहे.
Russia Ban Flights: युक्रेनवर सुरू असलेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर रशियाने अनेक देशांच्या विमान कंपन्यांवर बंदी घातली आहे. रशियाने घोषित केले आहे की, यूके आणि जर्मनीसह 36 देशांच्या विमान कंपन्यांच्या फ्लाइटवर बंदी घालण्यात आली आहेत. रशियन एअरलाईन्स आता बहुतेक युरोपीय देशांच्या तसेच कॅनडाच्या हवाई हद्दीत प्रवेश करू शकत नसल्यामुळे मॉस्कोचे विधान आले आहे. रशियाच्या निर्बंधांच्या यादीमध्ये जर्सी, यूके आणि जिब्राल्टर, ब्रिटीश परदेशी प्रदेश देखील समाविष्ट आहे.
बंदी घातलेल्या देशांतील विमान कंपन्या केवळ विशेष परवानग्या घेऊन रशियन हवाई क्षेत्रात प्रवेश करू शकतील. ब्रिटनने देशातील प्रमुख वाहक एरोफ्लॉट तसेच खाजगी जेट विमानांवर बंदी घातल्यानंतर रशियाने गेल्या आठवड्यात यूके एअरलाइन्सवर बंदी घातली होती. (वाचा - Ukraine-Russia War: युद्धाच्या काळात भारताचा मोठा पुढाकार! युक्रेनला पाठवणार औषधे)
दरम्यान, युरोपियन युनियन (EU) ने रविवारी युक्रेनवर सुरू असलेल्या हल्ल्यांदरम्यान खाजगी जेटसह रशियन विमानांसाठी आपली हवाई हद्द बंद करत असल्याची घोषणा केली. या निर्बंधांमुळे विमान कंपन्यांना काही मार्गांवर जास्त वळसा घालावा लागेल. त्यामुळे तिकिटांची किंमत वाढण्याची शक्यता आहे.
रशियाच्या हवाई क्षेत्रावर बंदी घालण्यात आलेले देशांत अल्बानिया, अँगुइला, ऑस्ट्रिया, बेल्जियम, ब्रिटिश व्हर्जिन बेटे, बल्गेरिया, कॅनडा, क्रोएशिया, सायप्रस, झेक प्रजासत्ताक, डेन्मार्क (ग्रीनलँड, फारो बेटांसह), एस्टोनिया, फिनलंड, फ्रान्स, जर्मनी, जिब्राल्टर , ग्रीस, हंगेरी, आइसलँड, आयर्लंड, इटली, जर्सी, लॅटव्हिया, लिथुआनिया, लक्झेंबर्ग, माल्टा, नेदरलँड, नॉर्वे, पोलंड, पोर्तुगाल, रोमानिया, स्लोव्हाकिया, स्लोव्हेनिया, स्पेन, स्वीडन, यूके यांचा समावेश आहे.