जामिया-एएमयूच्या समर्थनार्थ आंदोलनात उतरली जगभरातील प्रतिष्ठित विद्यापीठे; Oxford सह, Harvard येथेही नागरिकत्व कायद्याविरोधात निदर्शने

ऑक्सफर्ड (Oxford), हार्वर्ड (Harvard), येल, एमआयटी, कोलंबिया, स्टॅनफोर्ड आणि टुफ्ट्स यांच्यासह, जगातील अनेक प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थांच्या विद्यार्थ्यांनी पोलिसांच्या कारवाईविरोधात निदर्शने केली. परदेशी विद्यापीठांच्या कॅम्पसमध्ये निदर्शनाचे नेतृत्व तेथील भारतीय विद्यार्थ्यांनी केले.

File Image of Students of Jamia Millia Islamia taking out a protest march. (Photo Credits: IANS)

जामिया मिलिया इस्लामिया (Jamia Millia Islamia) आणि अलीगढ मुस्लिम विद्यापीठातील (Aligarh Muslim University) पोलिस कारवाईच्या विरोधात जवळजवळ संपूर्ण देशातील विद्यार्थी एकवटले आहेत. नागरिकत्व कायद्याविरोधात (Citizen Amendment Act 2019) निषेध नोंदवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विरोधात, पोलिसांनी ज्या क्रूरतेने पावले उचलली त्याविरोधात मद्रास विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनीही आंदोलने केली. आता या प्रकरणाचे लोण परदेशातही पोहचले आहेत. ऑक्सफर्ड (Oxford), हार्वर्ड (Harvard), येल, एमआयटी, कोलंबिया, स्टॅनफोर्ड आणि टुफ्ट्स यांच्यासह, जगातील अनेक प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थांच्या विद्यार्थ्यांनी पोलिसांच्या कारवाईविरोधात निदर्शने केली. परदेशी विद्यापीठांच्या कॅम्पसमध्ये निदर्शनाचे नेतृत्व तेथील भारतीय विद्यार्थ्यांनी केले.

विविध विद्यापीठांमधील 400 हून अधिक विद्यार्थ्यांनी संयुक्त निवेदनातून आपण जामिया आणि एएमयूच्या विद्यार्थ्यांसोबत असल्याचे सांगितले आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठाचे विद्यार्थी, संशोधक आणि माजी विद्यार्थ्यांनी जारी केलेल्या संयुक्त निवेदनात म्हटले आहे, ‘जामिया, एएमयू आणि इतर भारतीय शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांवरील हिंसाचाराचा आम्ही निषेध करतो.’ अशाप्रकारे जगभरातील अनेक विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी ही भूमिका घेतली आहे. विद्यापीठात आंदोलन करण्यासाठी आपल्या मूलभूत अधिकाराचा वापरा करत असलेल्या विद्यार्थ्यांविरूद्ध, पोलिसांनी ज्याप्रकारे बलाचा वापर केला, हे पाहून अनेक विद्यार्थ्यांनी सोशल मिडियाद्वारेही आपला रोष व्यक्त केला आहे.

(हेही वाचा: CAA: नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला मुस्लिम बांधव का करत आहेत विरोध?)

हार्वर्ड विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी आणि संशोधकांनी भारत सरकारला एक मुक्त पत्रही लिहिले आहे. त्यात म्हटले आहे की, ‘निदर्शक आणि विशेषत: महिलांचा जोश तोडण्यासाठी पोलिसांनी ज्याप्रकारे निष्ठुरता दाखवली ते पाहून आम्ही च्या थक्क व चिंतीत आहोत. या घटना योग्य कार्यपद्धती, जनसंघटना आणि असहमतीच्या हक्कांचे उल्लंघन आहेत हे नमूद करणे महत्वाचे आहे.’ दरम्यान, ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या विद्यार्थी आणि विद्वानांनी नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि विद्यार्थ्यांवरील पोलिस कारवाईविरोधात लंडनमधील इंडिया हाऊस येथे निषेध मोर्चादेखील काढला.