PIA on Verge Of Closure: पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्स बंद होण्याच्या मार्गावर; 10 दिवसांत तब्बल 300 हून अधिक उड्डाणे रद्द

पाकिस्तान स्टेट ऑइल (PSO) ने थकबाकी न भरल्याने इंधन पुरवठा कमी केला आहे. यामुळे 14 ऑक्टोबरपासून आंतरराष्ट्रीय मार्गावरील 134 उड्डाणांसह 322 उड्डाणे रद्द करावी लागली आहेत.

Flight Representational image. (Photo Credits: Pexels)

दिवसेंदिवस गरिबीकडे वाटचाल करत असलेल्या पाकिस्तानमध्ये (Pakistan) आता इंधनाची कमतरता भासू लागली आहे. पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्स (Pakistan International Airlines- PIA) इंधनाची अनुपलब्धता आणि आर्थिक संकटामुळे बंद होण्याच्या मार्गावर आहे. गेल्या 10 दिवसांत देशात 300 हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. राष्ट्रीय वाहक कंपनीच्या प्रवक्त्याने याला दुजोरा दिला आहे.

पाकिस्तान एअरलाइन्स कदाचित आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वात वाईट आर्थिक संकटाचा सामना करत आहे. पाकिस्तान स्टेट ऑइल (PSO) ने थकबाकी न भरल्याने इंधन पुरवठा कमी केला आहे. यामुळे 14 ऑक्टोबरपासून आंतरराष्ट्रीय मार्गावरील 134 उड्डाणांसह 322 उड्डाणे रद्द करावी लागली आहेत.

प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी 27 देशांतर्गत मार्गांसह एकूण 51 उड्डाणे रद्द करावी लागली. पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणावर उड्डाणे रद्द झाल्यामुळे हजारो प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रवक्त्याने सांगितले की व्यवस्थापन पर्यायी फ्लाइटमध्ये प्रवाशांना सामावून घेण्याचा प्रयत्न करीत आहे. उड्डाणे रद्द केल्यामुळे प्रवाशांना झालेल्या त्रासाबद्दल कंपनीने दिलगिरी व्यक्त केली आहे.

याआधी पाकिस्तानच्या सरकारी तेल कंपनीने सांगितले होते की, त्यांना तेल पुरवठा करण्यासाठी $220 दशलक्ष अग्रिम पैसे मिळाले आहेत. हे तेल पीआयएच्या 39 विमानांना देण्यात येणार होते. मात्र नंतर पीआयएने एक निवेदन जारी करून सांगितले की, त्यांना फक्त 4 विमानांसाठी तेल मिळाले आहे. पीआयने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, तेल न मिळाल्याने विमानांच्या उड्डाणांवर परिणाम होत आहे. (हेही वाचा: India to Resume Visa Services in Canada: कॅनडासोबतच्या तणावात भारताने पुन्हा सुरु केली 'या' 4 श्रेणींमध्ये व्हिसा सेवा, घ्या जाणून)

पाकिस्तान सरकारला भारताच्या एअर इंडियाप्रमाणे पीआयएचे खाजगीकरण करायचे आहे. पीआयएचे सध्या मोठे नुकसान होत आहे आणि त्यांच्याकडे कोट्यवधी रुपयांची थकबाकी आहे. पीआयएने काळजीवाहू सरकारकडे 23 अब्ज रुपयांची मदत मागितली आहे, जेणेकरुन विमान उड्डाणे चालू ठेवता येतील. यानंतर काळजीवाहू पंतप्रधान अन्वर उल हक काकर यांनी पीआयएच्या आर्थिक पुनर्रचना आणि स्थिरीकरणाची प्रक्रिया सुरू केली आहे.