कंगाल झालेल्या पाकिस्तानचा गरिबीचा नवा रेकॉर्ड; 1 डॉलरचे मूल्य झाले 150 पाकिस्तानी रुपये
आता पाकिस्तानी रुपया मूल्याच्या बाबतीत डॉलरच्या तुलनेत सर्वात कमी पातळीवर पोहचला आहे
आपल्या ढासळत चाललेल्या अर्थव्यवस्थेमध्ये सुधारणा आणण्यासाठी पाकिस्तान (Pakistan) शेजारील राष्ट्रे, आंतरराष्ट्रीय मुद्राकोष (IMF) यांच्याकडून मोठ मोठ्या रकमांची कर्जे घेत आहे. मात्र तरी देशातील गरिबी हटण्याची चिन्हे दिसेनात, उलट पाकिस्तानची दिवाळखोरीकडील वाटचाल मोठ्या वेगाने होत आहे. आता पाकिस्तानी रुपया मूल्याच्या बाबतीत डॉलरच्या तुलनेत सर्वात कमी पातळीवर पोहचला आहे. पाकिस्तानी मीडियाच्या अहवालानुसार, शुक्रवारी पाकिस्तानी रुपया डॉलरच्या तुलनेत 150 रुपये प्रति डॉलरवर आला आहे.
पाकिस्तानी रुपयांची तिथल्या आंतरबँक मार्केटमध्ये 149.50 रुपये आणि ओपन मार्केट मध्ये 150 रुपयांनी विक्री होत आहे. यापूर्वी याच आठवड्यामध्ये या रुपयाची किंमत 141 प्रति डॉलर झाली होती. पाकिस्तानच्या या वास्थेसाठी, उद्योगांना पोषक असे वातावरण पाकिस्तानमध्ये नाही. शिक्षणाचा अभाव, सामाजिकदृष्ट्या मागासलेला समाज, वाढती बेरोजगारी, दहशतवाद्यांची वाढती संख्या यांमुळे गेल्या 70 वर्षांत पाकिस्तानचा विकास झालाच नाही, अशी कारणे सांगितली जात आहेत. (हेही वाचा: गरीबीच्या उंबरठ्यावर पाकिस्तान; दोन ऐवजी एक चपाती खा- इम्रान खान सरकारचा सल्ला)
पाकिस्तान सरकारची गेल्या आठवड्यात आयएमएफ सोबत सहा अब्ज डॉलर्सच्या पॅकेज बद्दल बोलणी झाली होती. या करारानुसार आयएमएफ पाकिस्तानची ढासळणारी अर्थव्यवस्था वाचवण्यासाठी तीन वर्षांमध्ये 'बेलआउट पॅकेज' अंतर्गत सहा अब्ज डॉलर्स देणार आहे. गेल्या आठ महिन्यांपासून आयएमएफकडून आठ अब्ज डॉलर्सची मदत मिळावी म्हणून पाकिस्तान प्रयत्न करत आहे, शेवटी सहा अब्ज डॉलर्स देण्याचे ठरले. गेल्यावर्षी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकिस्तानवर 300 ट्रिलियन रुपयांचे कर्ज असल्याची माहिती दिली होती. मात्र सध्याची परिस्थिती पाहता, पाकिस्तानची आर्थिक स्थिती बदलेल अशी चिन्हे दिसत नाहीत.