पाकिस्तानी पत्रकार Arshad Sharif यांची केनियात गोळ्या घालून हत्या; पत्नीने केला दावा
तथापि, अर्शद शरीफ यांना 'चुकीच्या ओळखी'मुळे गोळ्या घातल्याचा दावा केनियातील स्थानिक आउटलेट्सने केला आहे.
पाकिस्तानी पत्रकार अर्शद शरीफ (Arshad Sharif) यांचा केनियात (Kenya) गोळ्या झाडून मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. त्याची पत्नी जवेरिया सिद्दीकी यांनी सोमवारी पहाटे याला दुजोरा दिला. दुसरीकडे, पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने अद्याप या प्रकरणाला दुजोरा दिलेला नाही. तथापि, अर्शद शरीफ यांना 'चुकीच्या ओळखी'मुळे गोळ्या घातल्याचा दावा केनियातील स्थानिक आउटलेट्सने केला आहे.
पाकिस्तानातील प्रतिष्ठित वृत्तपत्र डॉनच्या वृत्तानुसार, सोमवारी पाकिस्तानी पत्रकार अर्शद शरीफ यांची पत्नी जावेरिया सिद्दिकी यांनी ट्विट केले की, "मी आज माझा मित्र, पती आणि माझा आवडता पत्रकार (अर्शद शरीफ) गमावला आहे, पोलिसांच्या म्हणण्यानुसार, त्याला केनियामध्ये गोळ्या घालण्यात आल्या." (हेही वाचा - Toshakhana Case: Imran Khan यांना इस्लामाबाद उच्च न्यायालयाचा झटका; निवडणूक आयोगाचा निर्णय रद्द करण्यासंदर्भातील याचिका फेटाळली)
दुसरीकडे परराष्ट्र कार्यालयाचे प्रवक्ते असीम इफ्तिखार यांनी सांगितले की, केनियातील पाकिस्तानच्या उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्यांकडून अधिक माहिती गोळा केली जात आहे. दोन्ही देशांतील अधिकाऱ्यांनी मात्र अद्याप पत्रकाराच्या मृत्यूला दुजोरा दिलेला नाही. काही पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी सुरुवातीला शरीफ यांना गोळ्या लागल्याचे सांगितले. पण नंतर त्यांचा अपघाती मृत्यू झाल्याचे सांगितले.
मात्र, नंतर शरीफ यांच्या पत्नीने पत्रकाराला गोळ्या घालून ठार करण्यात आल्याचे ट्विट केले. दरम्यान, केनियातील मीडियाने स्थानिक पोलिसांच्या हवाल्याने म्हटले आहे की, शरीफ यांना "चुकीच्या ओळखीमुळे" पोलिसांनी गोळ्या घातल्या. रविवारी रात्री ही घटना नैरोबी-मगाडी महामार्गावर घडली.