Pakistan Shocking Video: पाकिस्तानमधील बेरोजगारी शिगेला; अवघ्या 1,167 पदांसाठी जमले 30 हजार तरुण, चक्क स्टेडियममध्ये घ्यावी लागली परीक्षा
2022 मध्ये पाकिस्तान इन्स्टिट्यूट ऑफ डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्स (PIDE) ने जारी केलेल्या अभ्यास अहवालानुसार, सध्या देशातील 31 टक्क्यांहून अधिक तरुण बेरोजगार आहेत. त्यात महिलांचा सहभाग 51 टक्के आहे.
गंभीर आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या पाकिस्तानचे (Pakistan) एक छायाचित्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद स्टेडियममधील या फोटोमध्ये 30 हजारांहून अधिक तरुण-तरुणी पोलीस खात्यात कॉन्स्टेबलच्या भरतीसाठी चक्क मैदानावर बसून लेखी परीक्षा देत असल्याचे दिसत आहे. हा फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होण्याचे कारण म्हणजे ही भरती अवघ्या 1,667 रिक्त पदांसाठी होत आहे, ज्यासाठी इतक्या मोठय प्रमाणावर तरुण-तरुणी जमले होते.
इस्लामाबाद पोलीस विभागाने 1667 पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवले होते. पोलीस विभागाच्या म्हणण्यानुसार, या परीक्षेसाठी मोठ्या प्रमाणावर लोक जमल्याने जागा अपुरी पडू लागली व त्यामुळे शनिवारी एका स्टेडियमवर कॉन्स्टेबल पदाच्या भरतीसाठी हजारो उमेदवारांकडून लेखी परीक्षा घेण्यात आली. इस्लामाबाद येथील क्रीडा संकुलात झालेल्या लेखी परीक्षेत सुमारे 32,000 पुरुष आणि महिला उमेदवार बसले होते. पोलीस विभागात गेल्या पाच वर्षांपासून मोठ्या प्रमाणात कॉन्स्टेबल पदे रिक्त आहेत. यावेळी 1,667 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
सोशल मीडियावर या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ समोर आल्यानंतर पाकिस्तानमधील बेरोजगारीची समस्या पुन्हा एकदा जगासमोर आली आहे. पाकिस्तानमध्ये सरकारी आणि खाजगी दोन्ही क्षेत्रात नोकऱ्यांची मोठी कमतरता आहे, ज्यामुळे बेरोजगारी शिगेला पोहोचली आहे. पाकिस्तानमधील आर्थिक संकटानंतर बेरोजगारीच्या समस्येबाबत सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. (हेही वाचा: LPG Gas in Plastic Bag: कंगाल पाकिस्तानमध्ये महागाईचा हाहाकार; प्लास्टिकच्या पिशव्यांमधून एलपीजी गॅस वापरत आहेत लोक)
2022 मध्ये पाकिस्तान इन्स्टिट्यूट ऑफ डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्स (PIDE) ने जारी केलेल्या अभ्यास अहवालानुसार, सध्या देशातील 31 टक्क्यांहून अधिक तरुण बेरोजगार आहेत. त्यात महिलांचा सहभाग 51 टक्के आहे. पाकिस्तानमध्ये सध्याचा बेरोजगारीचा दर 6.9 टक्के आहे. बहुतेक बेरोजगार लोकांकडे व्यावसायिक पदव्या आहेत. दुसरीकडे, पाकिस्तानमधील एकूण लोकसंख्येपैकी सुमारे 60 टक्के लोकसंख्या 30 वर्षांपेक्षा कमी वयाच्या तरुणांची आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)