पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ याची मुलगी मरियम नवाज यांना अटक
दुपारी तीन वाजपर्यंत मरियम नवाज यांनी एनएबी (NAB) समोर चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते.
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ (Nawaz Sharif) याची मुलगी मरियम नवाज (Maryam Nawaz) यांना गुरुवारी पाकिस्तानमध्ये अटक करण्यात आली. पाकिस्तानच्या नॅशनल एकाउंटेबिलिटी ब्यूरोने ही कारवाई केली. मरियम नवाज यांच्यावर साखर कारखान्यात भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे. या आरोपाच्या चौकशीसाठीच ही अटक करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, नेशनल एकाउंटेबिलिटी ब्यूरो (NAB) समोर चौकशीसाठी हजर राहण्यास मरियम नवाज यांनी नकार दिला. त्यामुळे NAB ने कारवाई करत त्यांना ताब्यात घेतले. मरियम नवाज या लाहोर येथील कोट लखपत कारागृहाबाहेर आपले वडील नवाज शरीफ यांना भेटण्यासाठी निघाल्या होत्या तेव्हा त्यांना अटक करण्यात आली. दुपारी तीन वाजपर्यंत मरियम नवाज यांनी एनएबी (NAB) समोर चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. (हेही वाचा, कलम 370 हटवल्यानंतर भडकलेल्या पाकिस्तानने भारतीय चित्रपटांवर घातली बंदी)
मरियम यांना एक प्रश्नावली देण्यात आली होती. हे प्रशन शुगर मिलशी निघडीत होते. या सर्व प्रश्नांची उत्तरं मरियम यांना गुरुवारी दुपारी तीन वाजेपर्यंत द्यायची होती. पाकिस्तानी मीडियाने दिलेल्या वृत्तानुसार, मरियम यांना एनएबी मुख्यालयात नेण्यात आले. मरियम यांना चौकशीसाठी हजर न झाल्याबद्दल आगोदरच वॉरंट जारी करण्यात आले होते.
दरम्यान, या आधी 31 जुलै रोजी मरियम एनएबीसमोर हजर झाल्या होत्या. तसेच, त्यांनी आपले म्हणने एनएबीसमोर मांडले होते. त्यांच्यावर शुगर फॅक्ट्रीशी संबंधीत भ्रष्टाचाराचे आरोप आहेत.