Pakistan: पाकिस्तानच्या पंतप्रधानपदावरून Imran Khan पायउतार; कॅबिनेट सचिवालयाने जारी केली अधिसूचना
पाकिस्तानचे सरन्यायाधीश उमर अता बंदियाल यांनी नमूद केले की, नॅशनल असेंब्ली विसर्जित करण्याबाबत पंतप्रधान आणि राष्ट्रपतींचे सर्व आदेश आणि कृती न्यायालयाच्या आदेशाच्या अधीन असतील
गेल्या अनेक दिवसांपासून पाकिस्तानच्या (Pakistan) राजकारणात गदारोळ माजला आहे. आज पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान (Imran khan) यांच्याविरोधात आलेला अविश्वास प्रस्ताव संसदेचे उपाध्यक्ष कासिम खान (Qasim Khan Juvayni) यांनी फेटाळून लावला. त्यानंतर आता जिओ न्यूजच्या वृत्तानुसार, पाकिस्तान कॅबिनेट सचिवालयाने रविवारी इम्रान खान यांना पंतप्रधानपदावरून हटवण्याची अधिसूचना जारी केली. अधिसूचनेत म्हटले आहे की, पाकिस्तानच्या राष्ट्रपतींनी नॅशनल असेंब्ली बरखास्त केल्यानंतर, इम्रान खान पंतप्रधानपदावर विराजमान राहू शकत नाहीत.
आज नॅशनल असेंब्लीच्या डेप्युटी स्पीकरने इम्रान खान यांच्या विरुद्धचा अविश्वास प्रस्ताव फेटाळला, त्यामुळे त्यांना सत्तेतून बाहेर काढून टाकण्याचा विरोधकांचा डाव पूर्णपणे फसला. इम्रान खान यांनी आपल्याबाबत ‘परदेशी षड्यंत्र’ रचत असल्याचा दावा केला होता. त्यानंतर जनतेशी संवाद साधताना, इम्रान खान म्हणाले की त्यांनी राष्ट्रपतींना नॅशनल असेंब्ली बरखास्त करण्याचा सल्ला दिला आहे. त्यानुसार नॅशनल असेंब्ली बरखास्त करण्यात आली असून, येत्या 90 दिवसांत पाकिस्तानात सरकारच्या म्हणण्यानुसार पुन्हा निवडणुका होतील.
दुसरीकडे, उपसभापतींचा अविश्वास प्रस्ताव फेटाळणे ही गोष्ट ‘असंवैधानिक’ असल्याचे विरोधकांनी म्हटले आहे. नॅशनल असेंब्ली विसर्जित करण्याच्या विरोधात विरोधकांनी रविवारी, 3 एप्रिल रोजी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. परिणामी, पाकिस्तान सर्वोच्च न्यायालयाच्या तीन सदस्यीय खंडपीठाने रविवारी नॅशनल असेंब्ली बरखास्त करण्याच्या विरोधकांच्या याचिकेवर सुनावणी सुरू केली. (हेही वाचा: पाकिस्तानमध्ये फेरनिवडणुका, राष्ट्रपतींकडून संसद बर्खास्तच; इमरान खान यांची शिफारस मान्य)
पाकिस्तानचे सरन्यायाधीश उमर अता बंदियाल यांनी नमूद केले की, नॅशनल असेंब्ली विसर्जित करण्याबाबत पंतप्रधान आणि राष्ट्रपतींचे सर्व आदेश आणि कृती न्यायालयाच्या आदेशाच्या अधीन असतील. दरम्यान, पाकिस्तानच्या संसदेमध्ये इमरान खान यांच्या पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफ (Pakistan Tehreek-e-Insaf) पक्षाचा मित्रपक्ष असलेल्या मुत्ताहिदा कौमी मूवमेंट पाकिस्तानने सरकारचा पाठिंबा काढला आहे. त्यामुळे इमरान खान सरकार अल्पमतात आले आहे. विरोधकांकडून इमरान खान यांनी आपले बहुमत गमावल्याचा दावा करण्यात आला आहे.