Pakistan: सरकार वाचवण्यासाठी Imran khan खोटे बोलले? 'परकीय षड्यंत्र' असल्याचा दावा अमेरिकेने फेटाळला

इम्रान खान यांच्या आरोपांवर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना, अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याच्या उपप्रवक्त्या जलिना पोर्टर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, ‘इम्रान खान यांच्या आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही.’

Pakistan PM Imran Khan | (Photo Credits: Facebook)

पाकिस्तानात (Pakistan) सरकार आणि सत्ता वाचवण्यासाठी धडपडणाऱ्या इम्रान खान (Imran Khan) यांच्या पदरी सर्व बाजूंनी निराशा हाती येत आहे. आता अमेरिकेने इम्रान खान यांचा विदेशी कारस्थानाचा आरोप साफ फेटाळून लावला आहे, ज्यामध्ये इम्रान खान यांनी विरोधी पक्षांच्या मदतीने वॉशिंग्टनमध्ये आपले सरकार पाडण्यासाठी कट रचल्याबद्दल सांगितले होते. इम्रान खान यांच्या या दाव्यांमध्ये तथ्य नसल्याचे अमेरिकेने म्हटले आहे.

आपल्या ‘स्वतंत्र परराष्ट्र धोरणा’मुळे विरोधकांचा अविश्वास प्रस्ताव हा ‘परकीय षडयंत्राचा’ परिणाम असल्याचा दावा इम्रान खान करत आहेत. तसेच आपल्याला सत्तेतून बेदखल करण्यासाठी परकीय निधीचा वापर केला जात असल्याचेही ते म्हणाले आहेत. शुक्रवारी राष्ट्राला संबोधित करताना, पंतप्रधान इम्रान खान यांनी आपल्या आरोपांचा पुनरुच्चार केला की, एका वरिष्ठ अमेरिकन मुत्सद्द्याने पाकिस्तानमध्ये शासन बदलण्याची धमकी दिली होती.

परराष्ट्र विभागातील दक्षिण आणि मध्य आशियाई व्यवहार ब्युरोचे सहाय्यक सचिव डोनाल्ड लू हे आपले सरकार पाडण्याच्या ‘परकीय कटात’ सामील असल्याचा आरोप इम्रान खान यांनी केला आहे. दुसरीकडे, इम्रान खान यांच्या आरोपांवर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना, अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याच्या उपप्रवक्त्या जलिना पोर्टर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, ‘इम्रान खान यांच्या आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही.’ (हेही वाचा: इम्रान खान सरकारला मोठा झटका; सर्वोच्च न्यायालयाने डेप्युटी स्पीकरचा निर्णय ठरवला घटनाबाह्य, 9 एप्रिलला होणार मतदान)

त्या पुढे म्हणाल्या, ‘आम्ही पाकिस्तानच्या घटनात्मक प्रक्रियेचा आणि कायद्याच्या आदर करतो आणि त्याचे समर्थन करतो, परंतु इम्रान खान करत असलेले हे आरोप अजिबात खरे नाहीत.’ यापूर्वी 31 मार्च रोजी यूएस स्टेट डिपार्टमेंटचे प्रवक्ते नेड प्राइस यांनीही पंतप्रधान इम्रान खान यांच्या आरोपांचे खंडन केले आणि त्यांना खोटे म्हटले. 27 मार्च रोजी इस्लामाबादमधील एका जाहीर सभेत पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकिस्तान सरकारला अमेरिकेकडून धोका असल्याचा दावा करणाऱ्या एका पत्राचा खुलासा केला होता.