मेरा भारत महान: कोरोना व्हायरसच्या लढाईबाबत भारताचे केले कौतुक; अमेरिकेमधील तेलुगु NRI विरोधात न्यू जर्सी येथे गुन्हा दाखल

अमेरिकेच्या न्यू जर्सी (New Jersey) येथे राहणाऱ्या तेलंगणा (Telangana) येथील एका अनिवासी भारतीय (NRI) महिलेविरूद्ध, अमेरिकेविरोधी वक्तव्य केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Coronavirus (Photo Credits: Getty Images)

अमेरिकेच्या न्यू जर्सी (New Jersey) येथे राहणाऱ्या तेलंगणा (Telangana) येथील एका अनिवासी भारतीय (NRI) महिलेविरूद्ध, अमेरिकेविरोधी वक्तव्य केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तेलगू एनआरआय स्वाती देवीनेनी (Swathi Devineni) यांनी ट्विट केले होते ज्यामध्ये त्यांनी कोरोना व्हायरसच्या या लढाईमध्ये भारत ज्याप्रमाणे लढत आहे, भारत सरकार ज्या प्रकारे प्रयत्न करीत आहे त्याची स्तुती केली होती. मात्र अमेरिकन सरकारने ही गोष्ट देशविरोधी आहे असा विशार करून स्वाती यांच्या विरुद्ध कारवाई केली आहे.

अमेरिकेच्या न्यू जर्सी येथे राहणा-या श्रवण नावाच्या एनआरआयने स्वाती देवीनेनी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. श्रावणच्या म्हणण्यानुसार, देवीनेनी यांनी एक व्हिडिओ ट्विट केला होता, ज्यात देशविरोधी गोष्टी बोलल्या गेल्या आहेत. या व्हिडिओमध्ये स्वाती देवीनेनी यांनी कोरोना व्हायरस लढाईबाबत अमेरिका आणि भारत यांची तुलना केली आहे. त्या म्हणतात, अमेरिकेसारखा शक्तिशाली देश कोरोना विषाणूसारखा साथीचा रोग रोखण्यात अपयशी ठरला, मात्र दुसरीकडे भारताने त्यावर मात केली आहे.

त्या पुढे म्हणतात, 'अमेरिका चांगली आरोग्य सुविधा असलेला संपन्न देश आहे. परंतु वेळेत अमेरिकेने कोरोना विषाणूचा संकट ओळखले नाही व टाळलेही नाही. मात्र या रोगाबद्दल भारताला पूर्वीपासूनच बर्‍याच गोष्टी समजल्या होत्या, अनेक देशांकडून माहिती मिळत होती. ज्यामुळे वेळीच उपाययोजना केल्या गेल्या व त्याचा मोठ्या प्रमाणात प्रसार होण्यास प्रतिबंध झाला. माझा भारत महान आहे.' (हेही वाचा: जगभरातील 52 देशांतील 22 हजार वैद्यकीय कर्मचाऱ्यांना COVID-19 संसर्ग- जागतिक आरोग्य संघटना)

स्वातीचा हा व्हिडिओ काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल झाला. तेलगू लोकांनी यावर संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केली, मात्र त्यानंतर सोशल मीडियावर स्वाती देवीनेनीने या व्हिडिओबद्दल दिलगिरी व्यक्त केली. त्यांनी याबाबतचे स्पष्टीकरणही दिले आहे, त्या म्हणतात, 'भारताच्या तुलनेत अमेरिकेला कमी लेखण्याचा माझा हेतू नव्हता. कोरोना व्हायरस साथीच्या रोगाचा भारत कसा सामना करीत आहे याबद्दल मी माझ्या मातृभूमीचे फक्त कौतुक केले आहे. ज्या गोष्टी मी इतरत्र वाचल्या त्याच मी बोलले.'