Muhammad Yunus to Lead Bangladesh: मुहम्मद यूनुस यांच्याकडे बांगलादेशचे नेतृत्व, आज स्थापणार नवीन अंतरिम सरकार

पंतप्रधान शेख हसीना (Sheikh Hasina) यांनी राजीनामा दिला आणि देश सोडला. हसीना यांच्या राजीनाम्यामुळे सरकार कोसळले.

Muhammad Yunus | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

नोबेल शांतता पुरस्कार विजेते मुहम्मद युनूस (Muhammad Yunus) यांच्या नेतृत्वाखाली बांगलादेशमध्ये आज (गुरुवार, 8 ऑगस्ट) नवीन अंतरिम सरकार (Interim Government Of Bangladesh ) स्थापन होत आहे. विद्यार्थ्यांनी अनेक आठवडे केलेल्या तीव्र निदर्शन (Student Protests) आणि संघर्षानंतर बांगलादेशमध्ये अभूतपूर्व स्थिती निर्माण झाली. ज्यामुळे पंतप्रधान शेख हसीना (Sheikh Hasina) यांनी राजीनामा दिला आणि देश सोडला. हसीना यांच्या राजीनाम्यामुळे सरकार कोसळले आणि बांगलादेशमधील स्थिती (Bangladesh Crisis) हाताळण्यासाठी लष्कराशिवाय पर्यायच उरला नाही. दरम्यान, देशाचे नेतृत्व करावे आणि सरकार स्थापन करावे यासाठी नोबेल विजेते मुहम्मद युनूस यांना विनंती केली. जी त्यांनी स्वीकारल्याने बांगलादेश सध्या अंतरीम सरकार स्थापन करण्याच्या टप्प्यावर आहे.

मुहम्मद युनूस यांचा शपथविधी

बांगलादेशची सूत्र हाती घेणारे मुहम्मद युनूस हे त्यांच्या मायक्रोफायनान्स नवकल्पनांमुळे "गरिबांसाठी बँकर" म्हणून ओळखले जातात. ते आज आपल्या सल्लागारांच्या टीमसह मुख्य सल्लागार म्हणून शपथ घेणार आहेत. ते पॅरिसहून ढाका येथे येत आहेत. जिथे त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू होते. (हेही वाचा, Bangladesh Crisis: बांगलादेशची धुरा सांभाळा; नोबेल पारितोषिक विजेते मुहम्मद यूनुस यांना आंदोलक विद्यार्थ्यांचे साकडे)

युनूस यांची प्रतिक्रिया

युनूस यांनी बांगलादेशमध्ये परत येण्याची आणि सुरु असलेल्या संकटावर मात करण्याचा विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले “मी घरी परत जाण्यास उत्सुक आहे. तेथे काय घडत आहे यावर माझी नजर आहे. देश म्हणून आम्ही यातून कसा मार्ग काढावा यासाठी प्रयत्न करत आहोत. त्याबाबत विचार करत आहोत. (हेही वाचा, Bangladesh Clashes: ढाकाहून 205 भारतीय प्रवाशांना घेऊन येणारे एअर इंडियाचे विमान दिल्लीत दाखल)

पंतप्रधानांचा राजीनामा

बांगलादेशवर सलग चार वेळा सत्तेद्वारे राज्य करणाऱ्या  शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आहे. नुकत्याच त्या पाचव्यांदा पंतप्रधान झाल्या होत्या. मात्र, सरकारी नोकरीतील आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सुरू झालेल्या मागण्या, आर्थिक अडचणी आणि राजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर वाढलेली आव्हाने पाहता त्यांनी पदाचा राजीनामा दिला. त्यांनी बांगलादेश सोडला असून सध्या त्यांनी भारताकडे राजाश्रय घेतला आहे.

निदर्शने आणि अशांतता

बांगलादेशमध्ये सुरु असलेल्या राजकीय संघर्षात मोठी जीवितहानी झाली आहे. प्राप्त माहितीनुसार हसीना यांच्या राजकीय पक्षातील अनेक नेते आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या हत्या झाल्या आहेत. आतापर्यंत 250 हून अधिक मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. वाढता संघर्ष पाहता परिस्थितीती निंत्रणात आणण्यासाठी लष्कराने शर्थीचे प्रयत्न केले. तसेच, सरकार स्थापन करण्यासाठी युनूस यांच्याकडे नेतत्व देण्यास लष्करी आणि सरकारी अधिका-यांनी त्वरेने मान्यता दिली. युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकार काही महिन्यांत निवडणुका घेण्याची शक्यता आहे. संसद बरखास्त करणे, पोलीस प्रमुखांना हटवणे आणि राजकीय कैद्यांची सुटका करणे अशा कृती यापूर्वीच करण्यात आल्या आहेत.