Hajj 2024: मक्का येथे 1,300 हून अधिक हज यात्रेकरूंचा मृत्यू; सौदी सरकारची माहिती

सौदी अरेबियाच्या आरोग्य मंत्रालयाने निवेदनात माहिती उघड केली आहे. त्यात, मृत्यूमुखी पडलेल्या लोकांपैकी 83 टक्क्यांहून अधिक 'अनधिकृत हज यात्रेकरू' होते, असेही म्हटले आहे.

Photo Credit -X

Hajj 2024: सौदी अरेबियाच्या आरोग्य मंत्रालयाने (Saudi Arabia Health Ministry)जारी केलेल्या निवेदनानुसार हज यात्रेदरम्यान 1301 लोकांचा मृत्यू(Hajj Yatra Death) झाला आहे. यातील अनेक प्रकरणे अति उष्णतेशी संबंधित आहेत. बहुतांश मृतांचा प्रवासही अनधिकृत असल्याचे सांगण्यात येत आहे. सीएनएनच्या अहवालानुसार, दर पाचपैकी चार मृत्यू अनधिकृत हज यात्रेला येणाऱ्या यात्रेकरूंचे आहेत. सौदी सरकारने एका निवेदनात म्हटले आहे की, खराब हवामानामुळे गंभीर आजारी पडलेल्या अनेकांवर अजूनही उपचार सुरू आहेत. मृत्युमुखी पडलेल्यांपैकी 83 टक्के 'हज करण्यासाठी अनधिकृत' होते. (हेही वाचा: Hajj 2024: मक्का येथे उष्णतेमुळे 1 हजारहून अधिक हज यात्रेकरूंचा मृत्यू; सौदी सरकारचा खुलासा)

मृतांची ओळख पटली

वृत्तानुसार, 1300 हून अधिक हाजींच्या मृत्यूबद्दल सरकारने दु:ख व्यक्त केले, 'कडक उन्हातही हे लोक आराम आणि निवारा न घेता पायी लांबचा प्रवास करत होते. मृतांमध्ये अनेक वृद्ध आणि गंभीर आजारी प्रवाशांचाही समावेश आहे'. सीएनएनच्या रिपोर्टनुसार, 'सर्व मृतांची ओळख पटली आहे. त्याच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न सुरू आहेत'.

अनधिकृत यात्रेकरूंच्या संख्येमुळे अडचणी वाढल्या

यंदाच्या हज यात्रेदरम्यान मोठ्या प्रमाणात मृत्यू होण्याचे कारण अतिउष्णता आणि तापमान नेहमीपेक्षा जास्त असल्याचे सांगितले जात आहे. सोमवारी मक्कामधील तापमान नव्या उच्चांकावर पोहोचले होते. हे तापमान 51 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त नोंदवले गेले. अनधिकृत यात्रेकरूंच्या संख्येमुळे अडचणी वाढल्या आणि मृतांचा आकडा वाढला असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.