Meghan Markle चा ब्रिटनच्या राजघराण्यावर वर्णभेदाचा आरोप; Oprah Winfrey ला दिलेल्या मुलाखतीमध्ये केले अनेक धक्कादायक खुलासे
मेगनने सांगितले की राजवाड्यात घडलेल्या गोष्टींमुळे तिला अतिशय वाईट वाटत होते व तिथे तिला आपलेपणा वाटत नव्हता, म्हणून तिने आणि प्रिन्स हॅरीने राजघराणे सोडण्याचा निर्णय घेतला. मुलाखती दरम्यान, मेगन मार्कल खूप भावनिक झाली होती. एका प्रश्नाच्या उत्तरात तर तिच्या डोळ्यात अश्रू आले
ब्रिटनचे राजकुमार हॅरी (Prince Harry) आणि त्यांची पत्नी मेगन मर्कल (Meghan Markle) यांनी मागच्या वर्षी शाही परिवार सोडण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता मागच्या महिन्यात ते शाही परिवाराचे सदस्य म्हणून परत येणार नसल्याच्या बातमीवर शिक्कामोर्तब झाले. आता नुकतेच प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कल यांनी टीव्हीवरील प्रसिद्ध व्यक्तिमत्व ओप्रा विन्फ्रेला (Oprah Winfrey) मुलाखत दिली, त्यामध्ये त्यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. मेगन मार्कलने ब्रिटीश राजघराण्यावर भेदभावाचा आरोप केला आहे. तिने असेही सांगितले की, की तिला जीवन संपवायचे होते व त्यासाठी ती आत्महत्येचा विचार करीत होती.
ही मुलाखत रविवारी अमेरिकन वृत्तवाहिनी सीबीएसवर प्रसारित झाली. यामध्ये मेगन मार्कल म्हणाली की जेव्हा ती मानसिक आरोग्याच्या समस्येशी झगडत होती तेव्हा तिला मदत केली गेली नाही. याशिवाय राजघराण्याच्या वतीने आपल्या मुलाच्या, आर्चीच्या रंगाबद्दल चिंता व्यक्त केली गेल्याचेही ती म्हणाली. मेगनचे वडील गोरे आहेत तर आई अश्वेत आहे. मेगनच्या म्हणण्यानुसार राजघराण्यातील या वर्णभेदामुळे ती इतकी त्रस्त झाली होती की तिने आत्महत्येसारखे गंभीर पाऊल उचलण्याचा विचारही केला होता.
मुलाखतीदरम्यान, मेगन मार्कल म्हणाली की राजघराण्यातील लोक तिच्या मुलाला प्रिन्स म्हणून पाहू इच्छित नव्हते, कारण त्यांच्यामते आर्ची हा अश्वेत होता. मात्र, यावेळी मेगनने कुणाचेही नाव घेतले नाही. प्रिन्स हॅरीने सांगितले की त्याचे पिता प्रिन्स चार्ल्स हे ब्रिटिश राजघराण्याचे वारस आहेत, मात्र त्यांनी आपला फोन उचलणे थांबवले होते आणि आपल्याला कोणतीही आर्थिक मदत केली नव्हती.
मेगनने सांगितले की राजवाड्यात घडलेल्या गोष्टींमुळे तिला अतिशय वाईट वाटत होते व तिथे तिला आपलेपणा वाटत नव्हता, म्हणून तिने आणि प्रिन्स हॅरीने राजघराणे सोडण्याचा निर्णय घेतला. मुलाखती दरम्यान, मेगन मार्कल खूप भावनिक झाली होती. एका प्रश्नाच्या उत्तरात तर तिच्या डोळ्यात अश्रू आले. राजघराण्यातील वातावरण तिला अनुकूल नव्हते असे तिने सांगितले. प्रत्येकजण तिथे आपल्यापासून विभक्त राहत होता, आपल्या मुलाबद्दल टिप्पण्या केल्या जात होत्या. मेगन मार्कलने असेही सांगितले की, तिने राजघराण्यातील वर्णभेदाविरोधात आवाज उठविण्यासाठी अनेकदा प्रयत्न केले पण प्रत्येक वेळी तिला शांत केले गेले.
(The above story first appeared on LatestLY on Mar 08, 2021 05:13 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

