Largest Hindu Temple in Germany: बर्लिनमध्ये बांधले गेले जर्मनीमधील सर्वात मोठे हिंदू मंदिर; दिवाळीमध्ये होणार गणपतीची प्रतिष्ठापना (See Photos)
यानंतर त्यांनी मंदिर बांधण्यासाठी पैसे जमा करण्यास सुरुवात केली.
तब्बल 20 वर्षांच्या अथक परिश्रमानंतर युरोपियन देश जर्मनीमध्ये (Germany) देशातील सर्वात मोठे हिंदू मंदिर (Largest Hindu Temple) पूर्ण झाले आहे. राजधानी बर्लिनमध्ये बांधलेले हे श्री गणेशाचे मंदिर 70 वर्षांच्या विलावनाथन कृष्णमूर्ती यांच्या अथक परिश्रमाचे आणि प्रयत्नांचे फळ आहे. या मंदिरात अद्याप देवाची मूर्ती बसवण्यात आलेली नाही. दिवाळी दरम्यान भव्य कार्यक्रमाचे आयोजन करून येथे मूर्ती स्थापन करण्याचा विचार कृष्णमूर्ती करत आहेत.
डीडब्ल्यूशी संवाद साधताना विलासनाथन कृष्णमूर्ती यांनी सांगितले की, ते 50 वर्षांपूर्वी जर्मनीला आले होते. येथे बर्लिनमध्ये राहत असताना ते एका इलेक्ट्रिकल कंपनीत काम करत होते. जर्मनीत आल्यापासून इथे एखादे हिंदू मंदिर बांधण्याचे त्यांचे स्वप्न होते. या स्वप्नाबाबत ते म्हणतात की, इथे प्रत्येकजण आपापल्या घरी सण साजरे करत होते मात्र मित्रांसोबत सण साजरा करण्यासाठी त्यांना जागा हवी होती. म्हणून त्यांनी 2004 मध्ये श्री-गणेश हिंदू मंदिर बांधण्यासाठी एक संघटना स्थापन केली.
असोसिएशनची स्थापना झाल्यानंतर काही दिवसांनी, बर्लिन जिल्हा प्रशासनाने त्यांना मंदिर बांधण्यासाठी हॅसेनहाइड पार्कच्या काठावर एक भूखंड दिला. यानंतर त्यांनी मंदिर बांधण्यासाठी पैसे जमा करण्यास सुरुवात केली. सन 2007 मध्येच मंदिराचे बांधकाम सुरू होईल, अशी त्यांची योजना होती. मात्र 2010 पर्यंतही ते सुरू होऊ शकले नाही. कृष्णमूर्ती सांगतात की, मंदिर बांधताना त्यांना चार प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागले. पहिली अडचण सरकारकडून मंजुरीची होती. दुसरी मंदिराच्या बांधकामाबाबतचे नियम, तिसरी अडचण पैशाची आणि चौथी मुदतीची. (हेही वाचा: Janmashtami 2023: मुंबईच्या ISKCON मंदिरात 3 दिवस साजरी होणार कृष्ण जन्माष्टमी; जाणून घ्या महाअभिषेक, महाआरतीसह संपूर्ण कार्यक्रम)
कृष्णमूर्ती सांगतात की त्यांना कर्ज घेऊन मंदिर बांधायचे नव्हते. कारण येणाऱ्या पिढ्यांना कर्ज फेडावे लागले असते. म्हणूनच जास्तीत जास्त देणगी जमा करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. आता देणगीच्या जोरावर जर्मनीमध्ये सर्वात मोठे हिंदू मंदिर बांधले गेले आहे. यासाठी बर्लिन प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारचे सहकार्य मिळाले नाही. गेल्या 5 वर्षांत मंदिराच्या उभारणीसाठी मिळणाऱ्या देणग्यांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. आता यंदाच्या दिवाळीमध्ये इथे 6 दिवसांचा कुंभभिषेक अभिषेक सोहळा आयोजित केला जाणार आहे. या कार्यक्रमादरम्यान भगवान श्री गणेशही मंदिरात विराजमान होणार आहेत.