Kim Jong-un यांचा नागरिकांना त्यांची नावे बदलण्याचा आदेश; आता North Korea मध्ये मुलांची नावे असतील Bomb, Gun आणि Satellite

ज्यांनी त्यांचा नावाचा शेवट क्रांतिकारी नावामध्ये बदलला नाही, त्यांना वर्षाच्या अखेरपर्यंत वेळ देण्यात आला आहे.

Kim Jong Un (Photo Credit: PTI)

उत्तर कोरियाचे (North Korea) नेते किम जोंग-उन (Kim Jong-un) हे त्यांचे चित्र-विचित्र निर्णय, आदेश यांसाठी जगभरात प्रसिद्ध आहेत. आता त्यांनी एक नवा आदेश जारी केला आहे, यानुसार देशातील पालकांना त्यांच्या मुलांची काही खास नावे ठेवावी लागतील. लहान मुलांची नावे ऐकायला कोमल वाटतील अशी ठेवू नयेत, असा आदेश किम जोंग यांनी दिला आहे. अशाप्रकारे किम जोंग-उन आता देशातील मुलांच्या नाव ठेवण्यावर कडक कारवाई करत आहेत.

दक्षिण कोरियामध्ये ए री (प्रेमळ), सो रा (शंख) आणि सु मी (सुपर ब्युटी) सारखी कोमल नावे लोकप्रिय आहेत. आता उत्तर कोरियामध्ये कोमल नावांच्या ऐवजी मुलांची चोंग इल (बंदूक), चुंग सिम (निष्ठा), पोक इल (बॉम्ब) अशी देशभक्तीपर नावे ठेवण्याचा आदेश जारी केला आहे. मुलांच्या नावामध्ये गोडवा नसेल अशी नावे ठेवण्याचे फर्मान किम जोंग-उनने दिले आहे. महत्वाचे म्हणजे, केवळ मुलेच नाही तर देशातील प्रत्येक नागरिक या कक्षेत येईल.

किम जोंग यांनी नवीन नावांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. या नव्या नावांतून देशभक्तीची भावना दिसून येते, असे त्यांचे मत आहे. ते म्हणतात की गोड आणि कोमल प्रकारची नावे दक्षिण कोरियन शैलीची आहेत आणि आता ती पाश्चात्य संस्कृतीचे प्रतीक बनत आहेत. किमचा आदेश आहे की, वर्षाच्या शेवटी, जे नागरिक आपली नावे बदलून क्रांतिकारक नावे ठेवत नाहीत, त्यांना दंड भरावा लागेल. इथले रहिवासी तक्रार करत आहेत की अधिकारी लोकांना त्यांची नावे बदलण्यास भाग पाडत आहेत. (हेही वाचा: आंदोलकांसमोर इराण सरकार झुकले; नैतिकता पोलीस युनिट बरखास्त, 'हिजाब'बाबतचा कायदा बदलण्याचा विचार)

गेल्या महिन्यापासून उत्तर कोरियातील रहिवाशांना त्यांची नावे बदलण्यासाठी सातत्याने नोटिसा बजावल्या जात आहेत. ज्यांनी त्यांचा नावाचा शेवट क्रांतिकारी नावामध्ये बदलला नाही, त्यांना वर्षाच्या अखेरपर्यंत वेळ देण्यात आला आहे. देशातील प्रत्येकाला त्याच्या नावाच्या शेवटी काहीतरी असे जोडावे लागेल जे राजकीय संदेश देईल. परंतु उत्तर कोरियातील नागरिक या आदेशावर खूश नाहीत. लोकांना आपल्या मुलांची नावे ठेवण्याचेही स्वातंत्र्य नसल्याची भावना नागरिकांच्या मनात निर्माण होत आहे.