Jobs Cuts: पुढील 5 वर्षांत जगभरातील 1.40 कोटी नोकर्या नष्ट होतील; अहवालात समोर आली धक्कादायक माहिती
सध्या कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांना कोणत्या कौशल्याची गरज आहे याचा पुनर्विचार करत आहेत.
सध्या कंपन्या मोठ्या प्रमाणात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) सारख्या तंत्रज्ञानाचा अवलंब करू लागल्या आहेत यामुळे जागतिक स्तरावर अर्थव्यवस्था कमकुवत होत आहे, यामुळे पुढील पाच वर्षांत जागतिक रोजगार बाजाराला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. एका नव्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (WEF) ने आपल्या ताज्या 'फ्यूचर ऑफ जॉब्स' अहवालात म्हटले आहे की, जागतिक स्तरावर रोजगार बदलाचा दर 23 टक्के असल्याचा अंदाज आहे.
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमला सर्वेक्षणातून असे आढळून आले आहे की, 2027 पर्यंत कंपन्या 69 दशलक्ष (6.90 कोटी) नवीन रोजगार निर्माण करतील. त्याच वेळी, त्या 83 दशलक्ष (8.30 कोटी) नोकऱ्या काढून टाकतील. यामुळे 14 दशलक्ष (1.40 कोटी) नोकऱ्यांचे नुकसान होईल. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम दरवर्षी स्वित्झर्लंडमधील दावोस येथे जागतिक नेत्यांची बैठक आयोजित करते. या ठिकाणी डब्ल्यूईएफने म्हटले आहे की, पुढील पाच वर्षांत जवळपास एक चतुर्थांश नोकऱ्या (23 टक्के) संपुष्टात येतील. या अहवालासाठी 803 कंपन्यांचे सर्वेक्षण केले गेले.
दुसरीकडे कृत्रिम बुद्धिमत्तेचा विकास आणि वाढ सकारात्मक तसेच नकारात्मक अशा दोन्ही प्रकारे काम करेल. एआय टूल्सची अंमलबजावणी आणि व्यवस्थापन करण्यात मदत करण्यासाठी कंपन्यांना नवीन कर्मचाऱ्यांची आवश्यकता भासेल, परंतु एआयच्या वाढीने अनेक रोजगारही संपतील. अहवालानुसार, मशीन लर्निंग विशेषज्ञ, सायबर सुरक्षा तज्ञ, डेटा विश्लेषक आणि वैज्ञानिक यांच्या रोजगारामध्ये 2027 पर्यंत सरासरी 30 टक्के वाढ होण्याचा अंदाज आहे. (हेही वाचा: जगप्रसिद्ध फॅशन ब्रँड 'गॅप' मध्ये होणार कर्मचारी कपात; जवळजवळ 1800 लोकांना नोकरीवरून काढून टाकले जाणार)
दरम्यान, सध्या ज्याप्रमाणे ऑटोमेशन, एआयमध्ये वाढ होत आहे ते पाहता 2027 पर्यंत 42 टक्के काम स्वयंचलित होईल असा अंदाज आहे. सध्या कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांना कोणत्या कौशल्याची गरज आहे याचा पुनर्विचार करत आहेत. कंपन्या आता कॉम्प्युटर प्रोग्रामिंगपेक्षा 'एआय टूल्स कार्यक्षमतेने वापरण्याच्या क्षमतेला' अधिक महत्त्व देत आहेत. या बदलांनुसार कर्मचार्यांना स्वतःला जुळवून घ्यावे लागेल.