Japan Population Crisis: 'महिलांनी 25 वर्षांपर्यंत करावे लग्न आणि 30 व्या वर्षी काढून टाकावे गर्भाशय'; जपानमधील लोकसंख्या संकटावर नेते Naoki Hyakuta यांचा अजब सल्ला
देशाची लोकसंख्या वाढवण्याच्या उपायांवर यूट्यूब चर्चेदरम्यान हयाकुटा यांनी हा विचित्र सल्ला दिला. त्यांनी सांगितले की 30 व्या वर्षी सक्तीने हिस्टेरेक्टॉमी (गर्भाशय काढून टाकणे) करणे आवश्यक आहे.
Japan Population Crisis: गेल्या काही वर्षांपासून घटत जात असणारी लोकसंख्या हे अनेक देशांसाठी मोठे संकट बनले आहे. अलीकडेच, रशियन सरकारने लोकसंख्या वाढवण्यासाठी सेक्स मंत्रालयाची स्थापना करणे आणि रात्री 10 ते पहाटे 2 वाजेपर्यंत इंटरनेट आणि लाईट बंद करण्याच्या प्रस्तावावर चर्चा केली होती. आता जपानमध्ये (Japan) एका मोठ्या विरोधी नेत्याने लोकसंख्या वाढवण्याचा अजब सल्ला दिला आहे. जपानमधील कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे नेते नाओकी हयाकुता (Naoki Hyakuta) म्हणतात की, जन्मदर वाढवण्यासाठी महिलांनी वयाच्या 18 व्या वर्षी महाविद्यालयीन शिक्षण बंद केले पाहिजे, वयाच्या 25 व्या वर्षी लग्न केले पाहिजे आणि वयाच्या 30 व्या वर्षी त्यांचे गर्भाशय काढून टाकले पाहिजे. त्यांच्या या वक्तव्यावर देशात जोरदार टीका होत आहे.
नाओकी हयाकुटा देशाचा कमी जन्मदर सुधारण्यासाठी त्यांच्या वादग्रस्त सूचनांमुळे चर्चेत आहेत. देशाची लोकसंख्या वाढवण्याच्या उपायांवर यूट्यूब चर्चेदरम्यान हयाकुटा यांनी हा विचित्र सल्ला दिला. त्यांनी सांगितले की 30 व्या वर्षी सक्तीने हिस्टेरेक्टॉमी (गर्भाशय काढून टाकणे) करणे आवश्यक आहे. यामुळे महिलांना लवकर मूल होण्यास भाग पाडले जाईल आणि जपानचा घटता जन्मदर थांबेल.
हयाकुटा यांनी पुढे सुचवले की, 25 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या स्त्रियांना लग्न करण्यास आणि 18 वर्षांनंतर विद्यापीठात प्रवेश घेण्यास प्रतिबंधित केले पाहिजे जेणेकरुन त्या चांगल्या माता म्हणून त्यांची भूमिका पार पाडू शकतील.ब यानंतर महिला आणि महिला हक्कांच्या वकिलांनी हयाकुटाच्या शब्दांवर जोरदार टीका केली. या टीकेनंतर, हयाकुटा यांनी X वरील एका पोस्टमध्ये माफी मागितली आणि ते म्हणाले की ते जे बोलले ते ‘अत्यंत कठोर’ होते आणि ‘ते म्हणायला नको होते.’ (हेही वाचा: Japan : जन्मदर वाढवण्यासाठी टोकियो प्रशासन डेटिंग ॲप लॉन्च करण्याच्या तयारीत; नेमकं प्रकरण काय? घ्या जाणून)
द इंडिपेंडंटच्या मते, ते म्हणाले की, ‘मी माझे शब्द मागे घेतो आणि माफी मागतो. माझ्या टिप्पण्या फक्त ‘काल्पनिक कल्पना’ होत्या आणि मी वैयक्तिकरित्या या कल्पनांना समर्थन देत नाही.’ उल्लेखनीय आहे की, जपान गेल्या काही दशकांपासून कमी जन्मदराच्या समस्येशी झुंजत आहे. सरकारी आकडेवारीनुसार, 2024 च्या पहिल्या सहा महिन्यांत जन्मलेल्या मुलांची संख्या 3,50,074 होती, जी 2023 च्या याच कालावधीच्या तुलनेत 5.7% कमी आहे.