दुर्मिळ मासे दिसल्याने घाबरून जपानमध्ये हाय अलर्ट; पुन्हा एकदा सुनामी आणि भूकंपाची शक्यता

तज्ञांच्या मते, सामान्यत: ऑर्फिश समुद्रात 1 हजार ते 3 हजार फूट खोल राहतात. समुद्राच्या आता खोलवर काही हालचाल होत असेल, तरच हे मासे वर येतात

ओरफिश (Photo Credit : Youtube)

तुम्ही कोणत्या माशाला घाबरता? नक्कीच शार्क आणि तत्सम माशांच्या प्रकारांना लोक घाबरतात मात्र एक आख्खा देश चक्क काही दुर्लभ मासे सापडल्याने हाय अलर्टवर आहे. हा देश आहे जगातील सर्वात विकसित देशांपैकी एक जपान. 11 मार्च 2011 रोजी जपानमध्ये सुनामी (Tsunami) नंतर भूकंपाने (Earthquake) घडलेली आपत्ती संपूर्ण जगाने पाहिली. या आपत्तीमध्ये सुमारे 20 हजार लोक मारले गेले. जपानचे अतोनात नुकसान झाले होते, आता कुठे हा देश या धक्क्यातून सावरला आहे. मात्र आता पुन्हा एकदा असाच महाकाय भूकंप आणि सुनामीच्या शक्यता वर्तवल्या जात आहेत, आणि हे घडले आहे समुद्रात सापडलेल्या दुर्मिळ माशांमुळे.

मच्छीमारांना जपानच्या ओकिनावा बेटा (Okinawa Island) जवळ महासागरात 13 फूट लांब दोन ओरफिश (Oarfish) आढळले आहेत. तज्ञांच्या मते, सामान्यत: ओरफिश समुद्रात 1 हजार ते 3 हजार फूट खोल राहतात. समुद्राच्या आत खोलवर काही हालचाल होत असेल, तरच हे मासे वर येतात. त्यामुळे भूकंपाचे संकेत देणारे म्हणून या माशांकडे पहिले जाते. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार गेल्या काही दिवसांत जपानमध्ये मच्छिमारांना अशा प्रकारचे सात दुर्मिळ मासे मिळाले आहेत. यापूर्वी 2011 मध्ये जपानच्या किनाऱ्यावर असेच मासे आढळले होते, त्यानंतर जपानमध्ये सुनामी आणि भूकंप आला. आता परत एकदा असे मासे आढळून आल्याने संपूर्ण देश घाबरला असून, हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. (हेही वाचा: सिंगापूरला मागे टाकत जपानचा पासपोर्ट ठरला सर्वात ‘पॉवरफूल’ भारतीय पासपोर्ट 81 व्या स्थानी)

तथापि, जपानमधील भूकंप शास्त्रज्ञांनी या गोष्टीमध्ये काही तथ्य नसल्याचे म्हटले आहे. या दुर्मिळ माशांना भूकंपाचा इशारा मिळतो याचा कोणताही पुरावे नाही. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, पर्यावरणातील बदलांमुळे हे मासे पृष्ठभागावर आले असतील. दरम्यान, 11 मार्च 2011 रोजी जपानच्या आेशिकोपासून 70 किमीवर 9 तीव्रतेचा भूकंपाचा तडाखा बसला होता. भूकंपाचे केंद्र 24 किमी खोल होते. त्यानंतर 20 मिनिटांनी सुनामीचा फटका होककाइदो व दक्षिणेकडे आेकिनावा बेटावर धडकून ते उद्ध्वस्त झाले होते.

सुनामीच्या विशाल लाटा फुकुशिमा दाइच अण्वस्त्र संयंत्रावर धडकल्या. त्यामुळे संयंत्र वितळू लागले व स्फोट झाले. या विध्वंसात 20 हजार पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला. जपानमधील ही घटना इतिहासातील सर्वात मोठी नैसर्गिक हानी मानण्यात येते, तर आलेला भूकंप हा शतकातील सर्वात मोठा भूकंप होता. त्यामुळे आता परत एकदा या माशांमुळे भूकंप आणि सुनामीची भीती व्यक्त केली जात आहे.