Japan: बाबो! एकाचवेळी 35 मुलींसोबत प्रेमाचे नाटक; Birthday Gifts साठी केला खटाटोप, जाणून घ्या काय घडले पुढे
त्याने प्रत्येक गर्लफ्रेंडला आपल्या वाढदिवसाची वेगवेगळी तारीख सांगितली होती. अशाप्रकारे तो या सर्व जणींच्याकडून वर्षाला 35 भेटवस्तू घेऊन त्यांची फसवणूक करीत असे.
प्रेमात एक दुसऱ्याला स्पेशल फील करवण्यासाठी भेटवस्तू दिल्या जातात. पण जर अशा भेटवस्तू मिळवण्याची सवयच लागली तर? लोकांची आपल्या वाढदिवसादिवशी इतरांनी आपल्याला काही भेटवस्तू द्याव्यात अशी अपेक्षा असते. मात्र जपानमध्ये (Japan) राहणाऱ्या एका व्यक्तीची ही अपेक्षा इतकी वाढली की त्यासाठी त्याने चक्क 35 मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढले. आपण असे अनेक लोक पाहतो जे त्यांच्या बॉयफ्रेंड/गर्लफ्रेंडच्या माघारी त्यांची फसवणूक करत असतात. मात्र जेव्हा ही गोष्ट समोर येते तेव्हा नक्कीच त्यांची फजिती होते व पुढच्या परिणामांना त्यांना सामोरे जावे लागते. जपानमधील या व्यक्तीच्या बाबतीतही असेच घडले आहे.
या व्यक्तीच्या एक दोन नव्हे तर एकाचवेळी 35 गर्लफ्रेंड होत्या. त्याने प्रत्येक गर्लफ्रेंडला आपल्या वाढदिवसाची वेगवेगळी तारीख सांगितली होती. अशाप्रकारे तो या सर्व जणींच्याकडून वर्षाला 35 भेटवस्तू घेऊन त्यांची फसवणूक करीत असे. मात्र, आता या व्यक्तीचे भांडे फुटले असून ही व्यक्ती तुरूंगातील हवा खात आहे. न्यूयॉर्क पोस्टमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, जपानमध्ये राहणारा 39 वर्षीय ताकाशी मियागावाला (Takashi Miyagawa) फसवणूकीच्या गुन्ह्याखाली तुरूंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. हा माणूस एकाचवेळी 35 मुलींना डेट करत होता.
हे सर्व तो फ्रीमध्ये गिफ्ट मिळावे म्हणून करत होता. ताकाशीला जेव्हा त्याच्या पहिल्या गर्लफ्रेंडने वाढदिवसादिवशी महागडी भेट दिली, त्यानंतर त्याला याची सवय लागली. ताकाशी घरोघरी जावून वस्तू विकण्याचा व्यवसाय करीत आहे. याचदरम्यान त्याची या सर्व मुलींशी ओळख झाली व त्याने त्यांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढायला सुरुवात केली. ताकाशी नेहमी या मुलींसोबत बाहेर डेटवर जायचा त्यावेळी त्याचे बिलदेखील या मुलींना भरायला लावायचा. त्याने गिफ्टसाठी यातील कोणत्याच मुलीशी ब्रेकअप केले नव्हते. (हेही वाचा: Kentucky: ऐकावे ते नवलच! नवऱ्याशी घटस्फोट घेऊन 31 वर्षीय महिलेने 60 वर्षीय सासऱ्याशी बांधली लग्नगाठ)
दरम्यान, ताकाशीचा खरा वाढदिवस 14 नोव्हेंबरला आहे. पण त्याने 35 मुलींना आपला वाढदिवस वेगवेगळ्या दिवशी सांगितला. यातील एका मुलीला ताकाशीचा संशय आला व तिने पोलिसांत तक्रार दिली, त्यानंतर चौकशीत हे प्रकरण उघडकीस आले. पुढे एकेक करून अनेक महिलांनी ताकाशीबद्दल तक्रार केली व आता त्याला तुरुंगात पाठवण्यात आले आहे.