पाकिस्तानचे नापाक कृत्य; जैश-ए-मोहम्मद प्रमुख मसूद अझहरची तुरुंगातून छुप्या रीतीने सुटका, भारताविरुद्ध कट रचण्याची योजना

मात्र आता टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, दहशतवादी संघटनेचा मास्टरमाइंड मसूद अझहरला (Masood Azhar) पाकिस्तानने छुप्या रीतीने सोडून दिले आहे.

Jaish-e-Mohammad chief Masood Azhar | File Image | (Photo Credits: PTI)

पाकिस्तानचा (Pakistan) एक भयंकर चेहरा पुन्हा एकदा समोर आला आहे. जगासमोर गोड गोड बोलणाऱ्या पाकच्या मनात किती कटुता भरली आहे, याची जाणीव पुन्हा एकदा झाली. संपूर्ण जगाला हे ठाऊक आहे की पाकिस्तान दहशतवादाला थारा देत आहे. याबाबत आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरही पाकिस्तानला फैलावर घेतले होते. मात्र आता टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, दहशतवादी संघटनेचा मास्टरमाइंड मसूद अझहरला (Masood Azhar) पाकिस्तानने छुप्या रीतीने सोडून दिले आहे. म्हणजेच आता मसूदची तुरुंगातून सुटका करण्यात आली आहे.

भारतावर दहशतवादी हल्ले करण्याच्या दृष्टीने हे पाऊल उचलेले गेले असल्याचे सांगितले जात आहे. अनुच्छेद 370 रद्द करून जम्मू काश्मीर राज्याला दोन केंद्रशासित प्रदेशात विभागण्याच्या भारत सरकारच्या निर्णयाने, पाकिस्तानला हादरा बसला आहे. अशात जम्मू-काश्मीरमध्ये जैश-ए-मोहम्मद (Jaish-e-Mohammed) आणि लष्कर-ए-तैयबा सारख्या संघटना वाढल्या आहेत. गुप्तचर विभागाने यापूर्वीही हा इशारा जारी केला आहे की, भारतामधील शांतता बिघडवण्यासाठी या संघटना कार्यरत आहेत, अशा परिस्थितीत पाकिस्तानकडून मसूद अझहरची सुटका होणे हे याच गोष्टीला खतपाणी घालत आहे. (हेही वाचा: 'जैश-ए-मोहम्मद'चा प्रमुख मसूद अजहर आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित)

विशेष म्हणजे, लष्कर-ए-तैयबाचे प्रमुख हाफिज सईद, जैश-ए-मोहम्मद प्रमुख मसूद अझर, लष्कर-ए-तैयबाचा कमांडर झाकी-उर-रहमान लखवी आणि फरार अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम यांना भारताने कायद्यानुसार दहशतवादी घोषित केले आहे. बुधवारी जाहीर झालेल्या राजपत्र अधिसूचनाच्या माध्यमातून ही घोषणा करण्यात आली. बेकायदेशीर कृती प्रतिबंध अधिनियम (यूएपीए) कायद्यातील दुरुस्तीस सुमारे महिन्यापूर्वी संसदेने मंजुरी दिली त्यानुसार भारताने हा निर्णय घेतला होता.