Israel Iran Conflict: इस्रायल-इराण संघर्षात बिअरशेवा येथील सोरोका रुग्णालयावर क्षेपणास्त्र हल्ला; आयडीएफचा दावा

Middle East Tensions: इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षात दक्षिण इस्रायलमधील सोरोका रुग्णालयावर थेट क्षेपणास्त्र हल्ला झाला आहे. इस्रायली लष्कराने इराणमधील 20 हून अधिक लष्करी आणि अण्वस्त्र प्रकल्पांवर प्रत्युत्तरादाखल हल्ले केल्याचे जाहीर केले आहे.

Israel Iran Conflict: इस्रायल-इराण संघर्षात बिअरशेवा येथील सोरोका रुग्णालयावर क्षेपणास्त्र हल्ला; आयडीएफचा दावा
Soroka Hospital Missile Strike | (Photo Credits: X/@IsraelMFA)

इस्रायल आणि इराण यांच्यातील तणाव (Israel Iran Conflict) वाढत असताना, दक्षिण इस्रायलमधील बिअरशेवा शहरातील सोरोका रुग्णालयावर (Soroka Hospital Missile Strike) थेट क्षेपणास्त्र हल्ला झाल्याचे इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयाने आणि इस्रायली संरक्षण दलाने (IDF Tehran Airstrikes) म्हटले आहे. इस्त्राइलच्या परराष्ट्र मंत्रालयाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर म्हटले की, BREAKING: बिअरशेवामधील सोरोका रुग्णालयावर थेट हल्ला झाला आहे. अधिक माहिती लवकरच दिली जाईल. यानंतर IDF ने देखील पुष्टी करत सांगितले की, क्षेपणास्त्रांच्या माऱ्यामुळे अनेक ठिकाणी हल्ले झाले असून, त्यातील एक दक्षिण इस्रायलमधील सर्वात मोठ्या रुग्णालयावर झाला आहे.

नागरिकांची आश्रयस्थळांकडे धाव

इस्रायलमधील लाखो नागरिकांनी या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आश्रयस्थळांकडे धाव घेतली, कारण इराणकडून क्षेपणास्त्र डागण्यात आल्याने देशभरात सायरन वाजवण्यात आले. IDF ने X वर लिहिले, संपूर्ण देशभर सायरन वाजत आहेत, आणि लाखो इस्रायली नागरिक सध्या आश्रयस्थळांकडे धावत आहेत. (हेही वाचा, Israel Iran Conflict: इराणचे लष्करी प्रमुख Ali Shadmani ठार, आयडीएफचा दावा)

इस्त्रायल आणि इराण यांच्यात परस्परांच्या शहरांवर हल्ले

दरम्यान, इस्रायली हवाई दलाने इराणवर प्रतिहल्ला करत तेहरानसह अनेक शहरांवर हवाई हल्ल्यांची लाट सुरू केली आहे. IDF ने म्हटले, हवाई दलाने तेहरान आणि इतर भागांवर हल्ल्यांची लाट सुरू केली आहे. तसेच इराणमधील अराक आणि खोंदाब शहरांतील नागरिकांना तातडीने स्थलांतर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. IDF ने फारसी भाषेत दिलेल्या निवेदनात सांगितले की, इराणी लष्करी पायाभूत सुविधांवर कारवाई सुरू आहे. (हेही वाचा, Iran-Israel War: इराणमध्ये मोठा विध्वंस! तेहरानच्या लष्करी तळावर हल्ला; इस्रायलने बंकरवर टाकला बॉम्ब)

सातव्या दिवशीही संघर्ष सुरुच

उभय देशांमधील संघर्ष आता सातव्या दिवशी पोहोचला आहे. 13 जून रोजी इस्रायलने 'Operation Rising Lion' अंतर्गत इराणमधील लष्करी आणि अण्वस्त्र प्रकल्पांवर मोठ्या प्रमाणात हवाई हल्ले सुरू केले. त्याला प्रत्युत्तर म्हणून, इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशन गार्ड कॉर्प्स (IRGC) ने 'Operation True Promise 3' अंतर्गत इस्रायलच्या लढाऊ विमान इंधन उत्पादन केंद्रांवर आणि ऊर्जा पुरवठा केंद्रांवर ड्रोन व क्षेपणास्त्र हल्ले केल्याचे इराणी वृत्तसंस्था IRNA ने सांगितले.

आयडीएफने गुरुवारी (19 जून) सांगितले की, तेहरानमधील 20 पेक्षा अधिक लष्करी ठिकाणांवर हल्ले करण्यात आले, ज्यामध्ये इराणच्या अणु प्रकल्पाशी संबंधित संशोधन केंद्रे आणि क्षेपणास्त्र निर्मिती युनिट्सचा समावेश होता. आयडीएफने पुढे स्पष्ट केले की, 60 इस्रायली लढाऊ विमानांनी अण्वस्त्र निर्मितीसाठी वापरण्यात येणाऱ्या युरेनियम संवर्धन केंद्रांवर, शस्त्र निर्माण स्थळांवर आणि संशोधन सुविधांवर हल्ले केले.

(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 1970 05:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).