Iran Shocker: इराणमध्ये जवळजवळ 5000 विद्यार्थिनींना दिले विष; मुलींना शाळेत जाण्यापासून रोखण्यासाठीचा प्रयत्न- Report

या घटनांमध्ये एकाही मुलीचा मृत्यू झाला मात्र, अनेकांना श्वसनाचा त्रास, उलट्या, चक्कर येणे आणि थकवा जाणवला आहे. नोव्हेंबरच्या घटनेपासून इराणमध्ये मोठ्या प्रमाणावर निदर्शने सुरू आहेत.

Image used for representational purpose only (Photo Credits: PTI)

इराणमधील (Iran) जवळजवळ 230 शाळांमधील सुमारे पाच हजार विद्यार्थिनींना विष देण्यात आल्याची घटना समोर आली आहे. मुलींना विषबाधा झाल्याच्या तक्रारीनंतर आता देशातील सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचे विधान समोर आले आहे. सर्वोच्च नेते खामेनी यांनी म्हटले आहे की, जर देशातील मुलींच्या शाळांमध्ये विद्यार्थिनींना हेतुपुरस्सर विषप्रयोग केला जात असेल तर अशा अक्षम्य अपराधासाठी दोषींना फाशीची शिक्षा दिली पाहिजे.

गेल्या अनेक महिन्यांपासून इराणमधील मुलींना विष दिले जात असल्याचा आरोप होत आहे. खामेनी यांनी पहिल्यांदाच यावर जाहीरपणे प्रतिक्रिया दिली. इराणचे मुख्य संसदपटू आणि या प्रकरणाबाबत स्थापन करण्यात आलेल्या तपास समितीचे सदस्य मोहम्मद हसन असफारी यांनी इस्ना वृत्तसंस्थेला सांगितले की, इराणच्या 31 पैकी 25 प्रांतांमधील सुमारे 230 शाळांमधील 5000 विद्यार्थिनींना विषबाधा झाल्याची तक्रार प्राप्त झाली आहे.

मात्र, एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थी आजारी पडल्याची माहिती अन्य कोणत्याही अधिकृत किंवा प्रसारमाध्यमांनी दिलेली नाही. यापूर्वी, इराणी मीडिया आणि कार्यकर्त्यांनी दावा केला होता की 1000 हून अधिक मुलींनी आजारी असल्याची तक्रार केली होती, त्यापैकी 400 मुलींना रुग्णालयात दाखल करावे लागले होते. इराणी अधिकाऱ्यांनी मात्र नेमकी आकडेवारी उघड केलेली नाही. अलीकडेपर्यंत या प्रकरणात टाळाटाळ केल्यानंतर इराणच्या अधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वीच ही घटना मान्य केली होती.

या घटनेमागे कोणाचा हात आहे आणि विषबाधेत कोणते रसायन वापरले होते, याबाबत अधिकाऱ्यांनी माहिती दिली नाही. इराणमध्ये महिलांविरुद्ध धार्मिक अतिरेकांचा इतिहास नाही. मात्र अचानक नोव्हेंबरपासून इराणच्या 30 प्रांतांपैकी 21 प्रांतांमध्ये 50 हून अधिक शाळांमध्ये विषबाधा झाल्याची नोंद अधिकाऱ्यांनी केली. इराणचे गृहमंत्री अहमद वाहिदी यांनी सांगितले की, तपासकर्त्यांनी काही दिवसांपूर्वी शाळांमधून संशयित विषाचे नमुने घेतले होते, परंतु त्यांनी अधिक तपशील दिला नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या घटनेमुळे सुमारे 60 शाळा प्रभावित झाल्या, त्यात मुलांची एक शाळा आहे. या घटनेचे जगभरातून तीव्र पडसाद उमटले होते. (हेही वाचा: South Korea: दक्षिण कोरियांमध्ये 1000 कुत्र्यांचा अत्याचारामुळे मृत्यू- रिपोर्ट)

दरम्यान, मुलींना शाळेत जाण्यापासून रोखण्यासाठी हा जाणीवपूर्वक प्रयत्न असल्याचे अनेकांचे मत आहे. या घटनांमध्ये एकाही मुलीचा मृत्यू झाला मात्र, अनेकांना श्वसनाचा त्रास, उलट्या, चक्कर येणे आणि थकवा जाणवला आहे. नोव्हेंबरच्या घटनेपासून इराणमध्ये मोठ्या प्रमाणावर निदर्शने सुरू आहेत. या घटनेच्या निषेधार्थ मंगळवारी हजारो शिक्षकांनी निदर्शने केली. आंदोलकांना पांगवण्यासाठी सुरक्षा दलांना पाण्याच्या तोफा आणि अश्रूधुराचा वापर करावा लागला. सरकारने पत्रकार, कार्यकर्ते आणि इतरांवर फौजदारी कारवाई सुरू केली आहे. इराणने मंगळवारी जाहीर केले की, या प्रकरणात त्यांच्या गुप्तचर संस्थांनी अटक करण्यास सुरुवात केली आहे.