Iran President Election: इब्राहिम रायसी यांच्या निधनानंतर इराणचा पुढील राष्ट्राध्यक्ष कोण? 28 जून रोजी होणार निवडणूक

इराणच्या राज्यघटनेच्या कलम 131 मध्ये म्हटले आहे की, इराणच्या राष्ट्राध्यक्षाचा पदावर असताना मृत्यू झाल्यास, उपराष्ट्रपतींना सरकार चालवण्यासाठी कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष म्हणून कार्यभार स्वीकारावा लागतो.

इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांचे हेलिकॉप्टर अपघातात निधन झाल्याने राष्ट्रपतीपदाची जागा रिक्त झाली आहे. दरम्यान, इराण सरकारने राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची घोषणा केली आहे. 28 जून रोजी देशाच्या 14व्या राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होणार आहे.

वृत्तानुसार, न्यायपालिका, सरकार आणि संसदेच्या प्रमुखांच्या बैठकीत राष्ट्रपती निवडणुकीची तारीख निश्चित करण्यात आली. प्रथम उपराष्ट्रपती मोहम्मद मोखबर यांची देशाच्या हंगामी राष्ट्रपतीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांचे हेलिकॉप्टर इराणच्या वायव्य प्रांतातील पूर्व अझरबैजानच्या डोंगराळ भागात रविवारी बेपत्ता झाले. सोमवारी सकाळी त्याचा अवशेष सापडला. या दुर्घटनेत राष्ट्राध्यक्ष आणि परराष्ट्र मंत्री हुसेन अमीर-अब्दुल्लाहियान यांच्यासह टीम सदस्यांच्या मृत्यूची पुष्टी झाली. ( Ebrahim Raisi Dead: 'भारत इराणच्या पाठीशी उभा' पंतप्रधान मोदींकडून इराणच्या राष्ट्राध्यक्षांच्या निधनावर शोक व्यक्त)

वृत्तसंस्था शिन्हुआच्या वृत्तानुसार, इराणच्या राज्यघटनेच्या कलम 131 मध्ये म्हटले आहे की, इराणच्या राष्ट्राध्यक्षाचा पदावर असताना मृत्यू झाल्यास, उपराष्ट्रपतींना सरकार चालवण्यासाठी कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष म्हणून कार्यभार स्वीकारावा लागतो. उपराष्ट्रपतींना केवळ 50 दिवस सत्ता ठेवण्याचा अधिकार आहे. या 50 दिवसांच्या आत इराणसाठी नवीन राष्ट्राध्यक्ष निवडला जाणे आवश्यक आहे.

कार्यक्रमानुसार 30 मे ते 3 जून या कालावधीत नोंदणी केली जाईल, असे अहवालात म्हटले आहे. यानंतर उमेदवारांना 12 ते 27 जूनपर्यंत प्रचार करता येणार आहे. IRNA च्या मते, घटनात्मक परिषदेने कार्यक्रमास प्राथमिक सहमती दर्शविली आहे.