Telangana Student Killed In Chicago: शिकागोमध्ये गोळीबारात भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू, हत्येनंतर भारताने केली कारवाईची मागणी

गोळीबाराची संपूर्ण माहिती अद्याप समोर आलेली नाही. परंतु, स्थानिक अधिकारी या घटनेचा तपास करत आहेत.

Telangana Student Killed In Chicago (फोटो सौजन्य - X/@NMukherjee6)

Telangana Student Killed In Chicago: अमेरिकेतील शिकागो (Chicago) मध्ये एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथे तेलंगणातील खम्मम जिल्ह्यातील 26 वर्षीय विद्यार्थी साई तेजाचा (Sai Teja) गोळीबारात मृत्यू झाला. खम्ममच्या ग्रामीण भागातील रमान्नापेट येथील रहिवासी असलेली साई तेजा नुकतीच पदव्युत्तर पदवी घेण्यासाठी चार महिन्यांपूर्वी अमेरिकेला गेला होता. गोळीबाराची संपूर्ण माहिती अद्याप समोर आलेली नाही. परंतु, स्थानिक अधिकारी या घटनेचा तपास करत आहेत. ही बातमी ऐकल्यानंतर साई तेजाच्या कुटुंबासाठी आणि त्याच्या मित्रांना मोठा धक्का बसला आहे.

शिकागो येथील भारतीय वाणिज्य दूतावासाने साई तेजाच्या हत्येबद्दल शोक व्यक्त केला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर दिलेल्या निवेदनात, वाणिज्य दूतावासाने दोषींवर त्वरित कारवाई करण्याचे आवाहन केले असून पीडित विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांना आणि मित्रांना शक्य ती सर्व मदत केली जाईल असे आश्वासन दिले आहे. 'भारतीय विद्यार्थी नुकारपू साई तेजाच्या हत्येमुळे आम्हाला धक्का बसला असून खूप दुःख झाले आहे. आम्ही दोषींवर त्वरित कारवाई करण्याची मागणी करतो. वाणिज्य दूतावास पीडितेच्या कुटुंबीयांना आणि मित्रांना शक्य ती सर्व मदत करेल,' असे वाणिज्य दूतावासाने आपल्या एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे. (हेही वाचा -Indian Student killed in Accident At Canada: कॅनडामध्ये ट्रकने सायकलला धडक दिल्याने भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू)

दरम्यान, मृत विद्यार्थ्याचे काका तल्लुरी सृजन यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना शुक्रवारी सायंकाळी 6.00 वाजता (स्थानिक वेळेनुसार) घडली. उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत गेलेल्या साई तेजावर दोन आफ्रिकन अमेरिकन संशयितांनी गोळ्या झाडल्या, असे सृजन यांनी सांगितले. तेजा बीबीए पूर्ण केल्यानंतर शिकागो येथील कॉनकॉर्डिया विद्यापीठात एमबीए करत होता. त्याने तिथे अर्धवेळ नोकरीही केली होती. (हेही वाचा - Indian Student Died in US: नवीन बंदूक साफ करतांना लागली गोळी, तरुणाचा वाढदिवसाच्या दिवशी मृत्यू)

प्राप्त माहितीनुसार, घटनेच्या दिवशी साई तेजा एका दुकानात गेला होता. कॅश काउंटरवर असताना दरोडेखोरांनी दुकानात घुसून पैशांची मागणी केली. तेजाने पूर्तता केल्यानंतर आणि रोख रक्कम दिल्यानंतर संशयितांनी त्याच्यावर दुकानाबाहेर गोळ्या झाडल्या. तथापी, खम्मम येथील साई तेजाच्या घरी शोक व्यक्त करण्यासाठी लोकांची गर्दी झाली आहे. अशा हिंसक घटनेत तरुणाचा जीव गमवावा लागल्याने स्थानिक लोक शोककळा व्यक्त करत आहेत.