भारतीय वंशाचे शास्त्रज्ञ वेंकी रामकृष्णन यांची UK Coronavirus तज्ज्ञ गटाच्या अध्यक्षपदी नियुक्ती
भारतीय वंशाचे शास्त्रज्ञ आणि नोबेल पारितोषिक विजेते प्रोफेसर वेंकी रामकृष्णन (Professor Venky Ramakrishnan) यांची कोरोना व्हायरस (Coronavirus) संबंधीच्या प्रकरणांवर नजर ठेवण्यासाठी,
भारतीय वंशाचे शास्त्रज्ञ आणि नोबेल पारितोषिक विजेते प्रोफेसर वेंकी रामकृष्णन (Professor Venky Ramakrishnan) यांची कोरोना व्हायरस (Coronavirus) संबंधीच्या प्रकरणांवर नजर ठेवण्यासाठी, ब्रिटनमधील तज्ञांच्या उच्चस्तरीय समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली आहे. ही समिती कोरोना विषाणूच्या संसर्गाचा फैलाव रोखण्यासाठी जगभरातून आलेल्या डेटाचे विश्लेषण करेल आणि या साथीवर दूरगामी उपाय शोधेल. प्राध्यापक रामकृष्णन हे जगातील सर्वात जुनी स्वतंत्र वैज्ञानिक अकादमी 'द रॉयल सोसायटी' (The Royal Society) चे अध्यक्षही आहेत. रॉयल सोसायटीने शुक्रवारी सांगितले की, डेटा विश्लेषणाच्या नवीन तंत्रामुळे ब्रिटनमधील कोरोना विषाणूच्या संकटाला सामोरे जाण्याची क्षमता वाढणार आहे.
रामकृष्णन, वय 67 यांचा जन्म तामिळनाडूमध्ये झाला आणि 2009 मध्ये त्यांना रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार मिळाला होता. रॉयल सोसायटीने दिलेल्या वृत्तानुसार, विविध देशांमध्ये साथीच्या रोगाविरुद्ध लढा देण्यासाठी राबवलेल्या उपायांचे विश्लेषण करण्यासाठी 'डेटा इव्हॅल्युएशन अॅण्ड लर्निंग फॉर व्हायरल एपिडिमिक्स' (डेलिव्हई) नावाचा एक ग्रुप स्थापन करण्यात आला आहे. या प्रयत्नाचे ब्रिटिश सरकारने स्वागत केले आहे.
डीईएलवीईद्वारे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय आकडेवारीचे विश्लेषण करून, कोरोना व्हायरसच्या प्रतिबंधासाठी उचललेली पावले आणि आखलेल्या रणनीतीद्वारे सार्वजनिक आरोग्य, सामाजिक आणि आर्थिक बाबींवर होणाऱ्या परिणामाचे मूल्यांकन केले जाईल. वेंकी रामकृष्णन यांच्या व्यतिरिक्त, 14 सदस्यीय समितीत त्यांची बहीण ललिता रामकृष्णन देखील आहेत, ज्या केंब्रिज विद्यापीठात संसर्गजन्य रोग आणि प्रतिकारशक्तीच्या प्राध्यापिका आहेत. (हेही वाचा: ढासळलेली अर्थव्यवस्था मार्गावर आणण्यासाठी डोनाल्ड ट्रंप घेणार भारतीय दिग्गजांकडून सल्ले; स्थापन केली समिती, सुंदर पिचाई, सत्या नडेला यांचा समावेश)
दुसरीकडे भारतीय-अमेरिकन खासदार रो खन्ना यांची व्हाईट हाऊस कोरोना व्हायरस अॅडव्हायझरी कौन्सिलमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे. व्हाइट हाऊसच्या 'ओपनिंग अप अमेरिका अगेन कॉंग्रेसियन ग्रुप' मधील 43 वर्षीय खन्ना हे एकमेव भारतीय-अमेरिकन खासदार आहेत. कौन्सिलमध्ये सामील झाल्यानंतर खन्ना हे, कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर कौन्सिलचा सदस्य या नात्याने, अमेरिकन लोकांना दिलासा देण्यासाठी मदत करतील.